मागच्या काही दिवसांपासून हिंदी भाषेवरून उत्तर आणि दक्षिण भारतीय कलाकारांमध्ये वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ‘हिंदी भाषिक नसलेल्यांनीही हिंदीमध्ये बोलायला हवं’ असं विधान केल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर अलिकडे अभिनेता अजय देवगणनं कन्नड अभिनेता किच्चा सुदीपला ट्वीटरवर टॅग करत ‘हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि कायम राहिल’ असं म्हटलं होतं. त्यानंतर अजय- सुदीप यांच्या वादावर अनेक सेलिब्रेटी तसेच राजकीय नेत्यांनी देखील आपली मतं मांडली होती. याच वादावर आता गायक सोनू निगमनंही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोनू निमगनं नुकतंच एका कार्यक्रमात अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्या हिंदी राष्ट्रभाषा वादावर प्रतिक्रिया दिली. या वादावर बोलताना तो म्हणाला, “संविधानात कुठेही हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे असं लिहिलेलं नाही. देशात हिंदी भाषा सर्वाधिक राज्यांमध्ये बोलली जाते. पण ती राष्ट्रभाषा नाही. तमिळ ही सर्वात जुनी भाषा आहे आणि यावरूनही संस्कृत सर्वात जुनी की तमिळ असा वाद अनेकदा होताना दिसतो. पण लोकांच्या मते तमिळ ही सर्वात जुनी भाषा आहे. देशात नव्या समस्या तयार करण्याआधी आपण ज्या समस्या आधीपासूनच आहेत त्यावर उत्तरं शोधायला हवी. त्या समस्या सोडवण्याची जास्त गरज आहे.”

आणखी वाचा- ‘बाबाच्या नावाची गोधडी…’ वडिलांच्या आठवणीत सायली संजीवची भावुक पोस्ट

दरम्यान अजय देवगणनं आपल्या एका ट्वीटमध्ये, ‘जर हिंदी ही राष्ट्रभाषा नसेल तर मग किच्चा सुदीप आपले चित्रपट हिंदी भाषेत डब करून प्रदर्शित का करतो?’ असा सवाल उपस्थित केला होता. यावर किच्चा सुदीपनं देखील अजयला उत्तर देत, अजयनं माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला असं म्हटलं होतं. त्यानं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, ‘सर तुम्ही जे हिंदीमध्ये लिहिलं ते मला समजलं आहे. कारण मी नेहमीच हिंदी भाषेचा सन्मान केला आहे. माझं या भाषेवर प्रेम आहे आणि मी हिंदी शिकलो आहे. तुम्ही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही पण जरा विचार करा जर का मी हेच कन्नडमध्ये लिहिलं असतं तर तुम्हाला समजलं असतं का?’

आणखी वाचा- “कुणीतरी पडला ना की बातमी रंगते…” ‘तमाशा लाईव्ह’चा थरारक टीझर पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागच्या काही दिवसांमध्ये भाषा वाद सर्वाधिक वाढलेला पाहायला मिळत आहे. याचं महत्त्वाचं कारण बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांना बॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत अधिक यश मिळणं हे मानलं जात आहे. अलिकडच्या काळात प्रदर्शित झालेले, ‘पुष्पा’, RRR आणि KGF 2 हे दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालले. त्या तुलनेत ‘द कश्मीर फाइल्स’ वगळता कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवता आलेली नाही.