महाराष्ट्राला आषाढी वारीची शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. आषाढ महिना लागला की, लाखो भक्तांना ओढ लागते ती पांडुरंगाला भेटण्याची. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी चालत जातात. विठुरायाचं नामस्मरण करीत, भजन आणि कीर्तनाद्वारे त्याचे गोडवे गात वारकरी विठुरायाला भेटण्यासाठी मैलोन् मैल पायवारी करतात.
रात्रंदिवस वारीत चालत विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना आपल्या शारीरिक कष्टांतही सुख वाटतं. रोज चालणं, ऊन-पावसाची तमा न बाळगता केवळ विठ्ठलभेटीच्या ओढीनं त्यांचं मन विठ्ठलाच्या भेटीच्या दिशेनं चालत राहतं. काही जणांना आपल्या कामामुळे या वारीमध्ये सहभाग घेता येत नाही; पण ते जमेल तसं या वारी सोहळ्यात सहभागी होतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात.
वारी सोहळ्यात प्रत्येक क्षेत्रातली माणसं सहभागी होत असतात. मराठी मनोरंजन क्षेत्रातीलही अनेक कलाकार वारीत सहभागी होतात. अशातच स्टार प्रवाह वाहिनीवरील काही कलाकार मंडळीसुद्धा यंदाच्या वारीत सहभागी होत आहेत. वाहिनीवरील मालिकांमधील अनेक कलाकार यंदाच्या वारीत सहभागी झाले आहेत. त्यात ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील काही कलाकार या वारीत सहभागी झालेत.
आदेश बांदेकर, सुमित पुसावळे आणि उदय नेनेंनी केली वारकऱ्यांची सेवा
स्टार प्रवाहवर आदेश बांदेकर हे वारीनिमित्त विशेष कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक कलाकार या वारी सोहळ्यात सहभागी होत आहेत. अशातच ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतील हृषिकेश आणि सारंग म्हणजेच अभिनेता सुमित पुसावळे आणि अभिनेता उदय नेने हे दोघेही या वारीत सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी वारकऱ्यांची सेवाही केली.
स्टार प्रवाह वाहिनीने आषाढी वारी सोहळ्याचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात अभिनेता सुमित पुसावळे आणि अभिनेता उदय नेने वारकऱ्यांची सेवा असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसभर चालून चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांची मालिश करण्याची सेवा ते यंदाच्या वारीत करीत आहेत.
सुमित पुसावळे आणि उदय नेने यांच्यासह अभिनेते आदेश बांदेकर यांनीसुद्धा ही सेवा अर्पण केली आहे. मलम लावत त्यांनी वारकऱ्यांच्या पायांची मालिश केली. या कलाकारांच्या सेवेचा हा व्हिडीओ साध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी त्यांच्या या कृतीचं कौतुक केलं आहे. अनेकांनी या व्हिडीओला “खूप छान”, “कौतुकास्पद”, “छान सेवा” या व अशा अनेक प्रतिक्रियांद्वारे प्रतिसाद दिला आहे.