‘सीआयडी’ ही मालिका हिंदी टेलिव्हिजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अनेक वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या मालिकेतील एका कलाकाराबद्दल एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. हा कलाकार म्हणजे या मालिकेत विवेकची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक मशरू. मनोरंजन सृष्टीला अलविदा करून गेल्या काही वर्षांपासून तो बंगळुरूच्या सीएमआर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करतो. आता त्याने अभिनय क्षेत्र का सोडलं, याचं कारण त्याने सांगितलं आहे.
विवेकने २०१२ साली अभिनय क्षेत्रातून एग्झिट घेतली. त्याबद्दल तो म्हणाला, “माझी पत्नी इंग्रजीची शिक्षिका आहे आणि तिनेच माझा फोटो व्हायरल झाला आहे मला सांगितलं. मी कधीही विचार केला नव्हता की माझ्या बाबतीत असं काही घडेल. पण जे काही घडलं त्याबद्दल मी खुश आहे. मी एका युनिव्हर्सिटीत एका अख्या डिपार्टमेंटचं संपूर्ण काम बघतो. तर आता जुलैमध्ये यातूनही बाहेर पडून मी नवी शाळा सुरू करणार आहे.”
‘सीआयडी’बद्दल बोलताना त्याने सांगितलं, “मी किशोर नावाच्या एका संस्थेतून ट्रेनिंग घेतलं होतं. तेव्हा मला माझ्या आईने सांगितलं की ‘सीआयडी’चे निर्माते त्यात ऑफिसरची भूमिका साकारण्यासाठी एका अभिनेत्याच्या शोधात आहेत. त्यानिमित्त त्यांची एक ऑल इंडिया कॉम्पिटिशन होती, ज्याचं नाव होतं ऑपरेशन तलाश. मी ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली. आमच्या घरी आधीपासून ही मालिका रोज पाहिली जायची त्यामुळे या मालिकेसाठी माझी निवड झाल्याचं कळताच माझ्या घरचे खूप खुश झाले.”
या मालिकेसाठी त्याचा करार फक्त तीन महिन्याचा झाला होता. पण निर्माते हा करार वाढवत गेले आणि सहा वर्ष विवेक या मालिकेसाठी काम करत होता. मनोरंजन सृष्टीतून बाहेर पडल्यानंतर विवेकच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्याने परदेशात जाऊन त्याचं शिक्षण पूर्ण केलं. त्या सगळ्याबद्दल तो म्हणाला, “मी अभिनेता होतो तेव्हा टोल नाक्यावर मला टोल भरावा लागायचा नाही, ट्राफिक पोलिसांनी कधी पकडलं तर माझी सही घेऊन ते मला सोडून द्यायचे, मी एकदा शिर्डीला गेलो होतो तेव्हा व्हीआयपी दर्शन झालं होतं. आता हे सगळं बदललं आहे. आता मी बसमध्ये सामान्यांसारखा प्रवास करतो, कुठेही जाताना रीतसर रांगेत उभा राहतो… हे सगळं सुरुवातीला माझ्यासाठी थोडं कठीण होतं पण नंतर मला याची सवय झाली.”