टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ आणि त्यात सहभागी होणारे स्पर्धक हे बऱ्याचदा चर्चेत असतात. ‘बिग बॉस १६’मध्ये अत्यंत जबरदस्त खेळ खेळत प्रेक्षकांची मनं जिंकणारे शिव ठाकरे व अब्दु रोजिक हे दोघेही सध्या एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहेत. ‘बिग बॉस १६’च्या या आवडत्या स्पर्धकांना ‘ईडी’कडून समन्स धडण्यात आल्याचे वृत्त समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
मीडिया रीपोर्टनुसार एका हाय प्रोफाइल मनी लॉन्ड्रिंग केससाठी या दोघांना साक्ष देण्यासाठी बोलावणं धाडण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर हे प्रकरण कुख्यात ड्रग माफिया अली असगर शिराजी याच्याशी संबंधित असल्याचंही सांगितलं जात आहे. अली असगर शिराजी ‘Hustlers’ Hospitality Pvt Ltd’ नावाची कंपनी चालवत होता आणि या कंपनीतून वेगवेगळ्या स्टार्ट-अप्सना आर्थिक सहाय्य पुरवलं जात असे.
आणखी वाचा : आता मोफत पाहायला मिळणार नोलनचा बहुचर्चित ‘ओपनहायमर’; वाचा कधी व कुठे?
या स्टार्ट-अप्समध्ये शिव ठाकरेचा ‘ठाकरे चाय अँड स्नॅक्स’ हे आऊटलेट आणि अब्दु रोजिकचे ‘बुर्गीर’ हा ब्रॅंडदेखील सामील आहेत. ड्रग्सच्या व्यवसायातून शिराजीने या अशा उद्योगांमध्ये पैसे गुंतवले. जेव्हा शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना या प्रकरणाविषयी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने त्यांचे शिराजी व त्याच्या कंपनीबरोबरचे करार रद्द केले.
ईडीला मिळालेल्या माहितीनुसार शिव ठाकरेची भेट ‘Hustlers’ Hospitality Pvt Ltd’ चे डायरेक्टर कृणाल ओझा यांच्याशी झाली होती अन् त्यांनी शिव ठाकरेबरोबर त्याच्या व्यवसायात भागीदारी करायचा प्रस्तावही ठेवला होता. या कंपनीने शिव ठाकरेच्या व्यवसायात चांगलीच रक्कम गुंतवली होती. तर २०२३ मध्येच अब्दु रोजिकच्या ‘बुर्गीर’ या फास्ट फूड ब्रॅंडचे एक हॉटेल मुंबईत सुरू केले. सोनू सुद आणि इतरही बरेच सेलिब्रिटीज त्यावेळी हॉटेलच्या उद्घाटनाला हजर होते.