‘महाभारत’ मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज व त्यांच्या एक्स पत्नी आयएएस अधिका स्मिता घाटे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद माध्यमांसमोर आला आहे. स्मिता व नितीश यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे. स्मिता या भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत अधिकारी आहेत, तर नितीश हे अभिनेते आहेत. या दोघांची भेट कशी झाली होती व स्मिता घाटे कोण आहेत, याबद्दल जाणून घेऊयात.
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, स्मिता घाटे यांचा जन्म १९६६ मध्ये पुण्यात झाला होता. त्यांनी सेंट्रल स्कूल लोहेगाव आणि सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या नवरोसजी वाडिया कॉलेजमधून मायक्रोबायोलॉजीमध्ये बीएएससी आणि गरवारे कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्समधून समाजशास्त्रात एमएची पदवी पूर्ण केली. त्या १९९२ च्या बॅचमधील आयएएस अधिकारी आहेत.
बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज आणि मध्य प्रदेश केडरच्या आयएएस अधिकारी स्मिता घाटे यांनी १४ मार्च २००९ रोजी दुसरं लग्न केलं होतं. या दोघांचाही पहिल्या लग्नानंतर घटस्फोट झाला होता. काही कॉमन मित्रांच्या माध्यमातून त्यांची भेट झाली. त्यांच्या मित्रांनी त्यांना त्यांच्या नात्याला संधी देण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर काही भेटीनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
नितीश भारद्वाज आणि स्मिता घाटे यांना जुळ्या मुली आहेत. देवयानी आणि शिवरंजनी अशी त्यांची नावे आहेत. जानेवारी २०२२ मध्ये नितीश यांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल माहिती दिली होती. दोघांनी परस्पर संपतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. स्मिता घाटे यांनी दिलेल्या निवेदनात नितीश भारद्वाज विभक्त झाल्याचा उल्लेख आहे.