अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व प्रसिद्ध गायक आशीष कुलकर्णी नुकतेच लग्नबंधनात अडकले. २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात दोघांचा शाही लग्नसोहळा पार पडला. लग्नात दोघांनी पारंपारीक लूक परिधान केला होता. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
दरम्यान लग्नसोहळ्यात आशीष व स्वानंदीचे वडील अभिनेते उदय टिकेकर यांच्यात खास बॉन्डिंग असल्याचे पहायला मिळाले होते. नुकतेच स्वानंदी व आशीषने लग्नानंतर पहिल्यांदा राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान या मुलाखतीत आशीषने उदय टिकेकर त्याला कोणत्या नावाने हाक मारतात याबाबतचा खुलासा केला आहे.
हेही वाचा- स्वानंदी टिकेकर-आशीष कुलकर्णीने ‘या’ हटक्या नावांनी सेव्ह केलेत एकमेकांचे नंबर, खुलासा करीत म्हणाले…
आशीष म्हणाला, “स्वानंदी मला बेबी म्हणून हाक मारते इथंपर्यंत ठिक आहे. पण तिच्या घरचे सगळे मला बेबी म्हणूनच हाक मारतात. मला माझे सासरे नानू, पूपू काय करतोय असं म्हणतात फोनवर. कारण स्वानंदी मला या नावाने हाक मारते.” स्वानंदी म्हणाली, “माझी आई, आईच्या मैत्रीणी त्यांचे मिस्टर सगळेच आशीषला बेबी म्हणून हाक मारतात. एवढंच नाही तर माझ्या बहिणीसुद्धा आशीषला बेबी भावजी म्हणतात.”
आशीषबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल वडिलांना कळाल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती याबाबतही स्वानंदीने भाष्य केले. स्वानंदी म्हणाली, माझ्या घरातून लग्नाबद्दल सारखी विचारणा केली जात होती. आई मला अनेक मुलांचे फोटो दाखवायची. मी जेव्हा घरी आशीषबद्दल सांगितलं तेव्हा माझ्या आई-वडिलांनी इंटरनेटवरुन आशीषबद्दल संपूर्ण माहिती काढली होती. एवढचं नाही तर उदय टिकेकरांनी आशीषला फोनही केला होता आणि त्याच्या गाण्याचे कौतुकही केले होते.