मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. ती सोशल मीडियावर कायमच तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. महिलांविषयी एखादा विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग याबद्दल हेमांगी अगदी खुलेपणाने बोलते. नुकतंच हेमांगीने एका ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे.
हेमांगी कवीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर एका व्यक्तीने अश्लील कमेंट केली होती. हेमांगी ही अश्लील कमेंट करणारी व्यक्ती कोण, याचा शोध घेतला. तिच्या पोस्टवर अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम BIO वर छत्रपती शिवाजी महाराज, आर्मी, बाप्पा लव्हर, असे लिहिण्यात आले होते. त्यावर तिने संताप व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : प्रिय केतकी, पत्रास कारण की.. तुझ्या धाडसाचं खूप खूप कौतुक!
हेमांगी कवीची स्टोरी
“BIO मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, गणपती बाप्पा , इंडियन आर्मी आणि प्रत्यक्षात वागताना? असली माणसं आतून जनावरच असतात. ‘माणसा’चं कातडं घालून समाजात हिंडत असतात. हे कुठल्याही चित्रपट , नाटकापेक्षा घातक आहे. चित्रपट काल्पनिक असतो, पण अशी जनावरं आपल्या आजूबाजूला आहेत, खरीखुरी. वार करतात पण पकडलेही जात नाहीत. हा माझ्यासाठी violence च आहे”, असे हेमांगी कवीने म्हटले आहे.
![hemangi kavi comment](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/12/hemangi-kavi-comment.jpeg?w=320)
विशेष म्हणजे हेमांगीच्या या पोस्टनंतर त्या युझरने कमेंट डिलीट केली आहे. “मी हे स्टोरीमध्ये पोस्ट केल्यावर याने कमेंट डिलिट केली आहे. म्हणून ही स्टोरी तुम्हाला दिसत नाहीये. चला, आपण आपल्या BIO मध्ये ज्यांचा उल्लेख केलाय, त्यांची आठवण आली असावी. चांगलंय!” असं हेमांगीनं म्हटलं आहे.
दरम्यान हेमांगी कवी सध्या एका हिंदी मालिकेत झळकत आहे. ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेत ती भवानी चिटणीस हे पात्र साकारत आहे. तिच्या पात्राचे प्रचंड कौतुक होताना पाहायला मिळत आहे.