Surabhi Bhave Bad Experience : मनोरंजन क्षेत्रात कलाकार होण्यासाठीचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अनेक मुलं/मुली येत असतात. पण, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे मुलींच्या वाट्याला असे अनेक वाईट अनुभव येत असतात. काही मुली या वाईट प्रसंगांच्या बळी ठरतात, पण काही मुली या घटनांना वेळीच रोखतात. या क्षेत्रात आपलं करिअर संपेल याची भीती मनात बाळगून अनेक अभिनेत्री गप्प बसतात आणि होणारा अत्याचार सहन करतात.
पण, काही अभिनेत्री मात्र अशा व्यक्तींना वेळीच चांगला धडा शिकवतात. अशीच एक मराठी अभिनेत्री आहे, जिने तिच्याबरोबर वाईट वर्तन करणाऱ्याला योग्य वेळी थेट उत्तर दिलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे. छोट्या पडद्यावरील मालिकांमधून सुरभी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकताच तिने राजश्री मराठीशी संवाद साधला आणि यावेळी तिने इंडस्ट्रीतील काही वाईट अनुभव सांगितले. तसंच यावेळी अभिनेत्रीने त्या व्यक्तींना योग्यवेळी धडा शिकवल्याचंही म्हटलं.
यावेळी सुरभी म्हणाली, “एक अभिनेता होता; तर एका शूटिंगच्या वेळी त्याचं खूप वाईट पद्धतीने बघणं सुरू होतं. मग मी त्याला विचारलं, ‘काय झालं? माझ्याकडे असं का बघत आहात?’ त्यावर तो उत्तर देत म्हणाला की, ‘नाही मी माझ्या विचारात आहे.’ इथे तो किस्सा संपला. त्यानंतर आता मी एक नाटक करत होते, तेव्हाही तो माणूस तिथे आला होता. त्यावेळी मी दिग्दर्शकाला स्पष्टपणे सांगितलं की, सर हा माणूस काम करणार असेल तर मी काम करणार नाही. माझं कास्टिंग झालेलं होतं. त्यात मी मुख्य भूमिकेत होते.”
सुरभी भावे इन्स्टाग्राम पोस्ट
यापुढे सुरभी म्हणाली, “यानंतर मला दिग्दर्शक म्हणाले, ‘हो… हो… ठीक आहे, आपण बघू आणि तो माणूस आमचं हे सगळं बोलणं ऐकत होता. त्यावर मीसुद्धा त्याला असं म्हटलं की, बरं झालं माझ्या मनात तुझ्याबद्दल काय भावना आहेत हे तुला कळलं. सध्या तो माणूस एका चांगल्या पदावर काम करतो आहे. पण, तेव्हा माझ्यात ती ताकद कुठून तरी आली. त्यानंतर मी ते नाटक केलं, कारण त्यावेळी माझ्याबरोबर वेगळे कलाकार होते.”
यापुढे तिने दुसरा किस्सा सांगितला की, “माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये एक सहाय्यक दिग्दर्शक होता, तो सारखा जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. त्यावर मी त्याला म्हटलं की, ‘तू हात लावू नको, मला सांग कुठे काय आहे?’ दुसऱ्या दिवशी तो परत जवळ आला तेव्हा मग मी स्पष्टच सांगितलं की, ‘परत हात लावला तर थोबाडीत देईन… जे काही असेल ते दुरून सांगायचं’. त्याला असं बोलल्यानंतर त्या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीच, तुला हे सगळं कसं जमतं? मला म्हणाली होती.”
दरम्यान, सुरभी भावे ही मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘भाग्य दिले तू मला’, ‘स्वामिनी’, ‘राणी मी होणार’, ‘सख्या रे’ अशा मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत आहे.