Ram Kapoor On Weight Loss Transformation : अभिनेता राम कपूर हा हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. आजवर त्यानं अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘बडे अच्छे लगते हैं’ ही मालिकासुद्धा त्यापैकीच एक. अभिनेता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी त्याचं वजन कमी केलं होतं. राम कपूरचा वजन कमी केल्यानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच त्यानं नुकतंच एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
राम कपूर अनेकदा मुलाखतींमार्फत त्याची मतं स्पष्टपणे मांडताना दिसतो. आता नुकतंच त्यानं त्याच्या कामाबद्दल वक्तव्य केलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खाननं नुकतीच त्याची भेट घेतली. फराह खान अनेक कलाकारांच्या घरी जाऊन तिच्या यूट्यूब चॅनेलसाठी व्हिडीओ शूट करत असते. यावेळी ती राम कपूरच्या घरी गेली होती. यादरम्यान गप्पा मारत असताना राम कपूरनं त्याच्या वजन कमी करण्याबद्दल आणि इंडस्ट्रीतील करिअरबद्दल सांगितलं आहे.
फराह राम कपूरच्या वजनाबद्दल बोलत असताना अभिनेता म्हणाला, “मी दोन वेळा माझं वजन कमी केलं आहे. दोन वेळा मी बारीक झालो आहे”. राम कपूर पुढे कामाबद्दल म्हणाला, “काही लोकांना काम मिळविण्यासाठी काहीच वेगळं करावं लागत नाही. त्यांना कामं मिळतात. मी स्टार नाहीये, मी कधी स्टार होऊ शकत नाही. माझं नाव खान नाहीये. पण, मी शारीरिकदृष्ट्या जाड असो किंवा बारीक; मला काम मिळतं. मी कामासाठी माझं वजन कमी नाही केलं, तर स्वत:साठी वजन कमी केलंय”.
राम कपूर याबद्दल पुढे म्हणाला, “मी स्वत:ला वचन दिलं होतं की, मी ५० किलो वजन कमी करणार”. पुढे वजन कमी करणाऱ्या ओझेम्पिक या औषधाबद्दल तो म्हणाला, “जर तुमच्या डॉक्टांनी तुम्हाला ते सुचवलं, तरच ते घ्या. पण, सोशल मीडियावर कोणाचंही ऐकून काहीही करू नका. जितक्या नैसर्गिक पद्धतीनं आयुष्य जगता येईल, तितक्या नैसर्गिकरीत्या जगा”.