‘नांदा सौख्यभरे’, ‘तू माझा सांगाती’ या मालिकांमुळे अभिनेत्री ऋतुजा बागवे घराघरांत लोकप्रिय झाली. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अलीकडेच ऋतुजाचे ‘लंडन मिसळ’ व ‘सोंग्या’ दे दोन दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. तिने रंगभूमीपासून तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती. नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ऋतुजा बागवेने तिचा आजवरचा प्रवास व इंडस्ट्रीत आलेल्या अनुभवांविषयी सांगितलं आहे.
ऋतुजा बागवे म्हणाली, “अभिनय क्षेत्रात आल्यावर नायिका बनण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. कारण, मी उत्तम अभिनय करते हे सर्वांनाच माहिती होतं. आपल्या भूमिका कमी-जास्त होत असतात पण, तू वाईट काम करतेस असं आजवर मला कोणीही सांगितलेलं नाही. खरंतर हीच आपल्या कामाची पोचपावती असते. याउलट नायिका म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मला असंख्य ऑडिशन द्याव्या लागल्या. खूपदा रिजेक्ट करण्यात आलं. या सगळ्या काळात सुद्धा मी अजिबात हरले नाही. कारण, एकांकिका स्पर्धेचा गाभा आपल्या पाठिशी आहे याची जाणीव मला होती. अनेक वर्षे रंगभूमीवर काम केल्याने एक दिवस माझ्या कामाची दखल नक्की घेतली जाईल ही खात्री होती.”
हेही वाचा : “आपलं आरोग्य चांगलं नसेल तर…”, आजारपणानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आला श्रेयस तळपदे; म्हणाला, “मी भोगलंय…”
ऋतुजा पुढे म्हणाली, “२००७ मध्ये मी माझी पहिली मालिका ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ मध्ये काम केलं. या मालिकेतून मला अचानक रिप्लेस करण्यात आलं होतं. त्यानंतर मी पुन्हा एकदा नाटकांकडे वळले. पुढे, वयाच्या २७ व्या वर्षी मला नायिका म्हणून पहिलं काम मिळालं. तोपर्यंत मी सगळ्या मालिकांमध्ये कॅमिओ, छोट्या-मोठ्या भूमिका, वयापेक्षा मोठ्या भूमिका करत होते. २००७ नंतर थेट २०१५ मध्ये मला नायिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ही आठ वर्षे मला स्वत:ला सिद्ध करावं लागलं.”
हेही वाचा : Bigg Boss 17: ‘बिग बॉस’ची यंदाची ट्रॉफी कशी असेल? पहिली झलक आली समोर
“इंडस्ट्रीत आधीचा एक काळ होता तेव्हा मुख्य भूमिका करणारी नायिका दिसायला अशीच पाहिजे असा एक समज होता. उंच, गोरी, डोळे घारे असल्यास उत्तम… एकंदर मुख्य अभिनेत्री अशा स्वरुपाची असावी असं सर्वांना वाटायचं. अभिनय काय १० किंवा शंभर एपिसोड्सनंतर कोणीही करेल पण, नायिकेकडे बघताना छान वाटलं पाहिजे. ही वाक्य मी ऐकली आहेत. तेव्हा मुक्ता बर्वेची मी एक मुलाखत ऐकली होती…तिने एक अनुभव सांगितलेला त्यामुळे माझं असं झालं की, मुक्ता बर्वे देखील या गोष्टीला चुकली नाही तिनेही सर्व फेस केलंय मग आपण कोण आहे? तिला दिसण्यावरून बोललं जात असेल तर आपलं काय? आपण लढत राहायचं काही ना काही चांगलं नक्की होणार… हे ध्येय ठेवून मी काम करत राहिले.” असं ऋतुजा बागवेने सांगितलं.