पाच पर्व सुपरहिट झाल्यानंतर आता ‘सूर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सहावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ असं या पर्वाचं नाव असेल. तर या आगामी पर्वामध्ये सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत स्पृहा जोशीच्या ऐवजी अभिनेत्री रसिका सुनील दिसणार आहे.
स्पृहा जोशीच्या ऐवजी रसिका सुनिल या कार्यक्रमाच्या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन करणार असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. रसिका पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार असल्याने तिचे चाहते खुश झाले आहेत, तर दुसरीकडे स्पृहा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार नसल्याने काही निराशा व्यक्त करत आहेत. पण आता या आगामी पर्वात स्पृहा दिसणार नसल्याबद्दल या कार्यक्रमाचा निर्माता आणि परीक्षक अवधूत गुप्तेला काय वाटतंय हे त्याने सांगितलं.
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत अवधूत गुप्ते म्हणाला, “मी स्पृहाला नक्कीच मिस करेन. किंबहुना आताही मी तिला मिस करतच आहे. पण आता रसिकासारखं एक नवीन नाव आलं आहे. आतापर्यंतच स्पृहा काय बोलायची, त्याला माझी प्रतिक्रिया काय असायची किंवा माझ्या बोलण्यावर स्पृहाचं उत्तर काय असेल हे ठसलेलं होतं. पण आता तसं नाहीये. आता रसिकाबरोबर नवीन बॉण्डिंग होईल, ती कशी प्रतिक्रिया देईल, कसं सूत्रसंचालन करेल, त्याला आम्ही कशा प्रतिक्रिया देऊ यातून काहीतरी नाविन्य घडेल याची मला खात्री आहे.”