Shivani Rangole : अभिनेत्री शिवानी रांगोळेने मुख्य भूमिका साकारलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला. २५ मे रोजी या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित झाला. गेली दोन वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. यामध्ये शिवानीने अक्षरा ही मुख्य भूमिका साकारली होती.
अक्षरा ही शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असते. याचदरम्यान, तिच्या आयुष्यात अशिक्षित अधिपतीची एन्ट्री होते. अधिपती अक्षराला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडतो. पुढे, परिस्थितीमुळे दोघांचं लग्न होतं अन् त्यानंतर अक्षराही अधिपतीच्या प्रेमात पडते अशी हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळाली होती. अधिपती या मालिकेत प्रेमाने अक्षराला ‘मास्तरीण बाई’ म्हणायचा. त्यामुळे आताच्या घडीला महाराष्ट्राच्या घराघरांत शिवानीला ‘मास्तरीण बाई’ अशी नवी ओळख मिळाली आहे.
मालिका संपल्यावर सध्या शिवानी आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवत आहे. अभिनेत्री नुकतीच तिच्या पतीसह विदेशात फिरायला निघाली आहे. एअरपोर्टवरील फोटो शेअर करत शिवानीने तिच्या चाहत्यांना ट्रिपला जात असल्याची हिंट दिली होती. आता स्वत: पोस्ट शेअर करत शिवानीने, ती सध्या जर्मनी येथे एन्जॉय करत असल्याचं सांगितलं आहे.
अभिनेत्रीने फ्रँकफर्ट ( जर्मनी ) येथील कॉफी व नाश्ताचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शिवानी लिहिते, “फ्रँकफर्टला आलो आणि आता इथून निघालो सुद्धा… जेव्हा तुमच्या फ्लाइटला उशीर होतो तेव्हा अशी प्रेक्षणीय स्थळं पाहायला मिळतात.”
आता शिवानी तिच्या इंटरनॅशनल ट्रिपमध्ये नेमकी कोण-कोणत्या देशात फिरणार, काय-काय पाहणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, शिवानीच्या या फ्रँकफर्ट येथील पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी “मालिका संपल्यावर तुम्हा सर्व कलाकारांची आठवण येतेय” असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर, अन्य काही युजर्सनी “मास्तरीणबाई कशा आहात? वेळेवर जेवताय की नाही”, “अक्षरा मॅम एकदम झकास फोटो” अशा कमेंट्स अभिनेत्रीच्या पोस्टवर केल्या आहेत. यावरून ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा चाहतावर्ग किती मोठ्या प्रमाणात होता हे स्पष्ट होतं.