Marathi Actress Varsha Usgaonkar : ‘बिग बॉस मराठी’चा बहुप्रतिक्षीत पाचवा सीझन आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनची गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. नव्या सीझनमध्ये कोण सहभाग घेणार याबद्दल आता चर्चा रंगू लागल्या आहेत. काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर बिग बॉसच्या घरात सहभागी होतील असं बोललं जात होतं. यासंदर्भात अनेक पोस्ट देखील व्हायरल झाल्या होता. या सगळ्यावर आता अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून निरोप घेतल्यावर वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं याबाबत सांगताना अभिनेत्री ‘मुंबई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “मी बिग बॉसच्या घरात सहभाग होत नाहीये. ही कल्पना कोणाच्या डोक्यातून आली याबाबत मला काहीच माहिती नाही. खरंतर या सगळ्या अफवा आहे. येत्या काळात मी केलेल्या दोन ओटीटी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतील. तसेच मी आता चित्रपटांकडे वळणार आहे. हिंदी-मराठी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करण्यास मी उत्सुक आहे.”
हेही वाचा : अंघोळ करताना फोन, ३ सेकंदात दिला होकार अन्…; अजय देवगणला ‘या’ चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार, म्हणाला…
वर्षा उसगांवकर ( varsha usgaonkar ) यांनी सांगितलं मालिका सोडण्याचं कारण
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सोडण्याबद्दल वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “या मालिकेत मी जी भूमिका साकारत होते त्याला पुढे जास्त काही वाव नव्हता. मी आणि आमचे निर्माते आम्ही दोघंही हे जाणून होतो. त्यामुळे आम्ही सामंजस्याने हा निर्णय घेतला. नायक, नायिका, खलनायिका यांच्या जोरावर ही मालिका पुढे जाईल. त्यामुळे मी या मालिकेचा निरोप घेतला. परंतु, भविष्यात अशाप्रकारच्या मालिकेत काम करायला नक्की आवडेल.” याशिवाय “माझं सुखाचं माहेर सुटलं” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने या मालिकेचा निरोप घेत असल्याचं सर्व चाहत्यांना सांगितलं होतं.

दरम्यान, वर्षा उसगांवकर यांना ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. त्यांनी आजवर मराठी व हिंदी अशा दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मालिकेचा निरोप घेतल्यावर आता पुन्हा एकदा वर्षा उसगांवकर चित्रपटांकडे वळणार आहेत.