झी मराठी वाहिनीवरील एका पाठोपाठ दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका बंद होणार असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये नाराजी होती. अशातच आता चाहत्यांची आवडीची आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ही मालिका म्हणजे ‘तुला शिकवीण चांगलाच धडा’. ‘तुला शिकवीण चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा-अधिपतीची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली.
या मालिकेत शिवानी रांगोळे अक्षराची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता हृषिकेश शेलार अधिपतीच्या भूमिकेत आहे. तसंच अभिनेत्री कविता मेढेकर भुवनेश्वरी या खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळवलं. मात्र आता दोन वर्षांच्या मनोरंजनानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. याबद्दल भुवनेश्वरीची भूमिका करणाऱ्या कविता मेढेकरांनी काही दिवसांपुर्वी स्वत: माहिती दिली.
‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका एकाच दिवशी प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. आज २५ मे रोजी या मालिकांचा महाएपिसोड प्रसारित होणार असून तोच मालिकांचा अखेरचा भाग असेल. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका निरोप घेत असल्याचे जाहीर होताच कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर केल्या. अशातच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या निरोपानिमित्त शिवानी रांगोळेनेही भावुक पोस्ट शेअर केली आहे.
शिवानीने इन्स्टाग्रामवर तिचे आणि मालिकेमधील इतर कलाकारांबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत आणि म्हटलं आहे, “लिओ टॉल्स्टॉय यांचं ‘सर्व आनंदी कुटुंबे सारखीच असतात’ हे माझं आवडतं वाक्य आहे. आज ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या आपल्या मालिकेचा शेवटचा भाग. २ वर्ष हसत, रडत, समजून घेत कुटुंबासारखे राहिलो आणि आज त्याच कुटुंबाला रेल्वे स्थानकावर निरोप देऊन सगळे आपापल्या वाटेला गेल्याची भावना आहे.”
यापुढे ती म्हणते, “पण समाधान चांगल्या माणसांनी एकत्र येऊन, चांगल्या हेतूने, चांगलं काम केलं आणि इथून पुढेही वेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून एकत्र येऊ आणि काम करत राहू. आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल, शिकवणीबद्दल आणि सांभाळून घेतल्याबद्दल प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद. आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या झी टीमचे खूप खूप आभार आणि संपूर्ण प्रवासात आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व माध्यमांना खूप खूप प्रेम! भेटूया पुन्हा!”
‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर आता वाहिनीवर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यापैकी एक मालिका म्हणजे किरण गायकवाडची ‘देवमाणूस – मधला अध्याय’. तर दुसरी अभिनेत्री विजया बाबरची मुख्य भूमिका असलेली ‘अशी ही आमची कमळी’ ही मालिकाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.