बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केलीय. गेल्या दोन आठवड्यांपासून आर्यन आर्थर रोड जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. यातच विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळल्याने त्याच्या शिक्षेत अजून वाढ झालेली आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीनीं प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच आता अभिनेत्री ट्विंकल खन्नाने या प्रकरणावर मौन सोडलंय. ट्विंकलने आर्यन खानच्या केसची तुलना सध्या नेटफ्लिक्सवर गाजत असलेल्या ‘स्क्विड गेम्स’ या वेब सीरिजमधील एका एपिसोडशी केली आहे.

ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॉगमधील काही भाग पोस्ट केलाय. “चला देसी स्क्विड गेम्स सुरू करुया” असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केलीय. लोकप्रिय दक्षिण कोरियन वेब सीरिज ‘स्क्विड गेम्स’ मधील एका एपिसोडचं तिने उदाहरण दिलं आहे. “या खेळात प्रत्येक खेळाडूला दहा मार्बल्स दिले जातात. तर विरुद्ध टीमसोबत स्पर्धा करत त्यांचे मार्बल्स घ्यायचे आहेत. या खेळात हे मार्बल गमावल्याने सर्वात दमदार खेळाडूला हार मानावी लागते. जेव्हा मी शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेची बातमी वाचली तेव्हा मलाही माझे मार्बल मिस झाल्यासारखं वाटलं”असं तिने पोस्टमध्ये म्हंटलंय.

“फालतू आणि मूर्खपणा करू नका, हा कुणाच्यातरी आयुष्याचा प्रश्न आहे”; आर्यन खानच्या अटकेवर कुब्रा सैतची प्रतिक्रिया


कोणताही पुरावा नसताना आर्यन खानला दोन आठवडे तुरुंगवास भोगावा लागणं हे अन्यायकारक असल्याची भावना तिने व्यक्त केलीय. “त्याच्या मित्राकडे ६ ग्रॅम चरस आढळून आली मात्र आर्यनकडून काहीच हाती लागलं नाही, तसा पुरावादेखील नाही. तरीही, हा मुलगा जवळपास दोन आठवड्यांपासून आर्थर रोड तुरुंगात आहे.”असं म्हणत आर्यन खानच्या अटकेवर ट्विंकलने खंत व्यक्त केलीय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आर्यन खानला विशेष न्यायालयाने जामीन नाकारला आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले.आर्यन खानच्या वकिलांनी ते उच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. मुंबई विशेष न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते आता आर्यन खानच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करतील. त्यामुळे आणखी काही काळासाठी आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागेल.