scorecardresearch

“सिझेरियन डिलिव्हरी नॉर्मल आहे”; आई झाल्यानंतर उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत

उर्मिलाने नुकतंच एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली की सिझेरियन? हे खूप कमी लोकांना माहित असेल.

“सिझेरियन डिलिव्हरी नॉर्मल आहे”; आई झाल्यानंतर उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत
(Photo : Instagram/ urmilanimbalkar)

मराठमोळी अभिनेत्री-युट्युबर उर्मिला निंबाळकरसाठी २०२१ हे वर्ष नवीन आनंद घेऊन आलं. नुकतंच ३ ऑगस्ट रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सध्या बाळंतपणाचा आनंद लुटत आहे. अशात ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय. आता तिने ‘सिझेरियन’ या विषयावर आधारित एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलीय. तिच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू असून ही पोस्ट व्हायरल होताना दिसून येतेय.

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरची डिलिव्हरी नॉर्मल झाली की सिझेरियन? हे खूप कमी लोकांना माहित असेल. महिलांच्या डिलिव्हरीबाबत नॉर्मल की सिझेरियन हा प्रश्न कायम त्यांना सतावत असतो. तसंच सिझेरियनच्या बाबतीत महिलांमध्ये खूपच समज समज आणि गैरसमज आहेत. ‘सिझेरियन’ हा विषय जरी आला की मातांना चिंता सतावत असते. अशा विषयावर खुल्या मनाने व्यक्त होण्यासाठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने लिहिले की, “अजून शंभराव्या व्यक्तीनं विचारायच्या आधीच ही पोस्ट! या पोस्टचे कारणही, मी यांचे उत्तर कोणतेही दडपण किंवा कमीपणा न घेतां देऊ शकते म्हणून, परंतु इतर स्रीयांना या इतक्या खाजगी प्रश्नाचा त्रास होऊ शकतो. कारण यांतही तीची तुलना केली जाऊन तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते. माझं ‘C’ section झालं.”

यापुढे तिने तिच्या सिझेरियनची कारणं देखील सांगत असताना पुढे लिहिलं की, “Delivery नंतर बाळ आणि मी दोघेही अतिशय सुदृढ आणि सुखरुप आहोत. माझ्या ओटीपोटाचे/कंबरेचे हाड/साचा आणि बाळाचे डोके हे समान मापाचे नव्हते. बाळाचे डोके हे मोठे असल्याकारणाने गर्भारपणात कितीही व्यायाम किंवा योग्य आहार घेतलात, तरीही अशा वाढ झालेल्या बाळांची नॉर्मल डिलिव्हरी शक्य नसते. यांचे कारण अनुवंशिकता.”

अभिनेत्री उर्मिला निंबाळक हिच्या डिलिव्हरीच्या वेळी बाळाच्या भोवती दोनदा नाळ गुंडाळली गेली जी इमर्जन्सी नव्हती. पण त्यामुळे बाळाला बाहेर येणे किंवा खाली घसरणे केवळ अशक्य होते, असं देखील तिने या पोस्टमध्ये सांगितलं.

सिझेरियनबाबत लोकांमध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत. त्यावर भाष्य करताना अभिनेत्री उर्मिला निंबाळकर म्हणाली, “प्रेग्नंसी डाएट आणि व्यायाम हे चोख पार पाडून मीही नॉर्मल डिलिव्हरी होण्याच्या प्रयत्नांतच होते आणि नॉर्मल साठीच प्रयत्न करायला हवा.”

कोणत्याही योग्य वैद्यकीय कारणांमुळे झालेली सीझर डिलिव्हरीही तितकीच नॉर्मल आणि नैसर्गिक आहे. त्यात त्या स्त्रीला नावं ठेवण्याचे कारण नाही. नॉर्मल असो वा सी-सेक्शन, बाळ आणि आई सुदृढ असण्याला प्राधान्य हवे, असं देखील उर्मिलाने तिच्या या पोस्टमध्ये म्हटलंय.

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने तिच्या सिझेरियन डिलिव्हरीचा हा अनुभव शेअर करून तिने खुलेपणाने विचार मांडल्याबाबत तिचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येतंय.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-08-2021 at 18:04 IST

संबंधित बातम्या