‘त्या’ तिघी सध्या काय करताहेत..?

बँकिंगपासून सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातीपर्यंत अनेक मोठय़ा ब्रॅण्ड्सचे प्रतिनिधित्व या तिघींकडे आहे

(संग्रहित छायाचित्र)

जाहिराती, सुपरहिट चित्रपटांची समीकरणे आणि नवनव्या चित्रपटांच्या घोषणा अशी नित्यनेमाने काकिर्दीची यशस्वी गाडी धावत असतानाच सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, अमली पदार्थविरोधी पथकाच्या चौकशी फेऱ्यात अडकलेल्या ‘त्या’ तिघी सध्या काय करीत आहेत, अशी चर्चा होती. दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या तिघींची चौकशीच्या फेऱ्यातून सुटका झाल्यानंतर त्यांच्या जाहिरातींवर झालेला थोडाफार परिणाम सोडला तर सध्या नवीन चित्रपट, नवे ब्रॅण्ड आणि प्रसिद्धी कार्यक्रमांमध्ये त्या व्यग्र झाल्या आहेत.

बँकिंगपासून सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातीपर्यंत अनेक मोठय़ा ब्रॅण्ड्सचे प्रतिनिधित्व या तिघींकडे आहे. त्यामुळे सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बॉलीवूडचे अमली पदार्थाशी असलेले संबंध नव्याने उघडकीस आले आणि या प्रकरणात तिघींचीही नावे गोवली गेली. याप्रकरणी दीपिकाची चौकशी करण्यात आली. तर श्रद्धा आणि सारा या दोघींचाही सुशांतच्या फार्महाऊसवर झालेल्या पार्टीत असलेला सहभाग आणि तिथे अमली पदार्थाचे सेवन केल्याचा संशय यासंदर्भात् चौकशी करण्यात आली. या तिघींच्याही  अमली पदार्थाशी थेट कोणताही संबंध न आढळल्याने त्या यातून बाहेर पडल्या आहेत. मात्र दरम्यानच्या काळात या तिघींवर चित्रित झालेल्या अनेक जाहिराती थांबवण्यात आल्या होत्या. जाहिरातींवर झालेला हा परिणाम सोडला तर दीपिका आणि श्रद्धा कपूर या दोघींनीही नवीन चित्रपटांचे करार केले आहेत. श्रद्धाने याच काळात आणखी एका ब्रॅण्डचेही प्रतिनिधित्व स्वीकारले आहे.

दीपिका पदुकोण सध्या गोव्यात शकुन बात्रा दिग्दर्शित चित्रपटाचे चित्रीकरण करते आहे. या चित्रपटानंतर नोव्हेंबरमध्ये शाहरूख खान आणि जॉन अब्राहमबरोबर ‘पठान’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात ती सहभागी होणार आहे. शिवाय, अश्विन नाग दिग्दर्शित प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटातही दीपिका मुख्य भूमिके त असून भन्साळींच्या आगामी ‘बैजू बावरा’ चित्रपटाच्या रिमेकमध्येही ती दिसणार असल्याची चर्चा आहे. जाहिरातींसाठीची तिची मागणीही कमी झालेली नाही. श्रद्धा कपूरने याच काळात ‘एफडीसीआय’च्या ‘डिजिटल इंडियन फॅशन कोटुर २०२०’ या फॅशन शोसाठी रॅम्प वॉक केले. ‘मेरोला’ या नव्या ज्वेलरी ब्रॅण्डचा चेहरा म्हणून श्रद्धावर चित्रित झालेली जाहिरातही सध्या सगळीकडे झळकते आहे. तर ‘नागिन’ या नव्या चित्रपटात ती इच्छाधारी नागिणीच्या भूमिकेत आहे. साराने अजून नव्या चित्रपटांना सुरुवात केली नसली तरी तिच्या ‘कुली नं. १’ चित्रपटाचे प्रसिद्धी कार्यक्रम सध्या जोरदार सुरू आहेत, शिवाय आनंद एल. राय यांच्या आगामी ‘अतरंगी रे’ या चित्रपटात ती दाक्षिणात्य अभिनेता धनुषबरोबर दिसणार आहे. चौकशीचा फार्स मागे टाकू न सध्या तरी या तिघींना आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलेले दिसते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: What are the three of them doing now that they are stuck in the anti drug squad investigation round abn