News Flash

१०५. मिथ्य सोडूनि द्यावे

मिथ्य म्हणजे मिथ्या कल्पना. आता कल्पना ही माणसाची एक मोठी क्षमता आहे, यात शंका नाही.

मिथ्य म्हणजे मिथ्या कल्पना. आता कल्पना ही माणसाची एक मोठी क्षमता आहे, यात शंका नाही. ‘असं का?’ या प्रश्नाचा शोध या कल्पना शक्तीच्याच जोरावर सुरू झाला. त्यातून निसर्गातील अनेक रहस्यं जशी माणसाच्या हाती लागली तसेच नवनवे शोधही लागले. अनेक यंत्रं, अनेक उपकरणं, अनेक तंत्रं यांच्या शोधाची वा विकासाची सुरुवात या कल्पनाशक्तीच्या जोरावरच सुरू झाली. ज्युल्स व्हर्न यांच्या काही कादंबऱ्यांत याच कल्पनाशक्तीच्या जोरावर ज्या वैज्ञानिक शोधांची वर्णनं आली ते नंतर लागलेही! तेव्हा कल्पनाशक्ती ही अशी भविष्याचा वेध घेणारी असू शकते. कल्पनेचं हे सकारात्मक समाजहितैषी रूप विलक्षण आहेच, पण हीच कल्पना जेव्हा ‘मी’केंद्रित देहभावानुसार फोफावू लागते तेव्हा तीच माणसाला अखेर चिंता आणि काळजीच्या डोहातही बुडवू शकते. स्वत:विषयीचं भ्रामक आकलन करवून ही कल्पना माणसाला जशी अतिशयोक्त विश्वासानं चुकीच्या मार्गाला नेऊन त्याची घसरण साधू शकते तशीच त्याचा स्वत:वरचा विश्वास उडवून  त्याला न्यूनगंडानं पोखरूनही टाकू शकते. म्हणूनच समर्थ या मिथ्या कल्पना टाकून द्यायलाच सांगतात आणि या मिथ्या कल्पनांच्या जोरावर मिथ्या पसारा मांडायला विरोध करतात. आता साधनपथावर आलेला माणूस मायेची शाब्दिक निंदा बरीच करतो, पण आपल्या अंतरंगात असलेली सूक्ष्म घातक अशी मिथ्या कल्पना त्याला जाणवतही नाही. नव्हे, उलट ती तो जोपासतो! जुन्या दासबोधातल्या पूर्ण समाधान प्रकरणाचा उल्लेख मागे केला आहेच. त्यात समर्थ सांगतात, ‘‘.. त्वां माया िनदावी। आणि कल्पना जतन करावी। गुप्त करूनि लपवावी। आपुली म्हणोनियां।।’’ हे साधका तू मायेची िनदा करतो, पण कल्पना मात्र आपली स्वत:ची आहे, जणू ती योग्य विचारच आहे, योग्य धारणाच आहे, असं मानून ती लपवतोस. ती जतन करतोस. पण, ‘‘तुजी कल्पना हेचि माया। ते आधी धाडी विलया। मग हें स्वसुख पहावया। अधिकारी होसी।।’’ तुझ्या देहबुद्धीतून प्रसवलेली जी कल्पना आहे तीच माया आहे. तिचा आधी विलय कर. त्याशिवाय जे निजसुख आहे, जे आत्मसुख आहे ते पहाणंदेखील तुला साधणार नाही, मग भोगण्याची गोष्ट दूरच! थोडक्यात साधना करतानाही जी लहानशी कल्पना मनात शिरकाव करते ती हळूहळू मनाचाच ताबा घेते आणि मनाला मायेच्या प्रपंचाकडेच खेचत नेते. जपाला बसल्यावर अनेक प्रसंगं आठवतात. कोण काय बोललं, कोण कसं वागलं, कोणाचं काय झालं.. मग त्यातून कल्पनेनंच पुढे काय होईल, हे ‘सुचू’ लागतं! आणि जे सुचतं ना, ते बहुतेकवेळा नकारात्मकच असतं. त्यातून मग मीसुद्धा कसं त्याला स्पष्ट बोललं पाहिजे, मीसुद्धा त्याच्या चुका कशा त्याला स्पष्ट सांगितल्या पाहिजेत, मी कसं दुसऱ्याला त्याची जागा दाखवून देता येईल असं वागलं पाहिजे.. वगैरे विचार कल्पनेतून प्रसवू लागतात. त्यानं अंतर्मन नकारात्मक विचारांनी भारून जातं. अस्वस्थतेच्या झळांनी पोळू लागतं. तेव्हा साधीशी कल्पनाही मायेच्या पकडीत मला सहज पोहोचवते. तेव्हा साधकानं तर कल्पनेच्या जाळ्यातून सुटलंच पाहिजे. समर्थानी म्हटलं आहे, ‘‘देहचि होऊन राहिजे। तेणें देहदु:ख साहिजे। देहातीत होतां पाविजे। परब्रह्म तें।।’’ आता हे देहच होऊन राहणं म्हणजे काय? तर देहच मी, या दृढ कल्पनेनं जगू लागलो तर देहाची दु:खं विक्राळ रूप धारण करतील. लहानसहान दु:खंही त्या कल्पनेमुळे मोठी भासू लागतील. जर देहातीत होता आलं, म्हणजे देह असूनही देहभान विसरता आलं तरच मनाला व्यापक होता येईल. आता तुम्ही म्हणाल, ‘देहच मी’, ही कल्पना असेल तर, देहभान विसरणंसुद्धा कल्पनाच नाही का?

-चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 4:11 am

Web Title: imagination is big potential of men
Next Stories
1 १०४. सत्य वाचे वदावे
2 १०३. सांडणे आणि मांडणे
3 १०२. प्रमाण-अप्रमाण
Just Now!
X