05 July 2020

News Flash

४१५. नवाय नवरूपाय!

सज्जनगडावर रामनवमीचा उत्सव थाटात होई.

 

जगात खऱ्या अर्थानं जो ‘अनाथ’ आहे, ‘दीन’ आहे त्याच्यासाठी परमात्मा अवतरित होतो, असं गेल्या वेळी म्हंटलं. आता हा जो भगवंताचा जन्म आहे, हा जो अवतार आहे तो म्हणजे काय आणि हा परमात्मा तरी कोण? पुराणांतरी अनेक अवतारांची वर्णनं आहेत. त्यातल्या दहा प्रमुख अवतारांचा मागोवा आपण घेतला. पण प्रश्न असा की दोन अवतारांच्या मधला जो कालखंड आहे तो अवताररहित आहे का? म्हणजेच कल्की हा जो अवतार अपेक्षित आहे तो व्हायला सनातन धर्मानुसार कित्येक लाख वर्षांचा अवधी आहे. मग आता कोणताही अवतार नाही का? तर तसं नव्हे! हा अवतार तर सदोदित सुरूच आहे! यासाठी ‘मनोबोध’ म्हणजेच श्रीसमर्थ विरचित ‘मनाचे श्लोकां’तील पुढचा श्लोक आता पाहू. प्रथम हा मूळ श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे :

जनाकारणें देव लीळावतारी।

बहूतांपरीं आदरें वेषधारी।

तया नेणती ते जन पापरूपी।

दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी।। १२६।।

प्रचलित अर्थ : लीलावतारी देव जनांसाठी अनेक वेष घेतो. नाना अवतार धारण करतो. अशा दयामय देवाला न जाणणारे ते पापी दुरात्मे, घातकी आहेत.

आता मननार्थाकडे वळू. मनाचे श्लोक मुळात जन्माला कसे आले हे आपण या सदराच्या अगदी सुरुवातीलाच पाहिलं होतं. निमित्त साधंच होतं. सज्जनगडावर रामनवमीचा उत्सव थाटात होई. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडून धन-धान्याची मदत मिळत असे. त्यामुळे शिष्यवर्गही निश्चिन्त असे. ज्याचा उत्सव करतो तो परमात्माच खरा आधार आहे, हा भाव या निश्चिन्त स्थितीमुळे ओसरला होता आणि भौतिकाचा आधार शिष्यांच्या मनानं अधिक खरा मानला होता. परम सद्गुरू समर्थाना ही गोष्ट कशी रुचणार? मग असं घडलं की रामनवमी उत्सवाची तयारी सुरू झाली तरी राजांकडून नेहमीची मदत आली नाही. कल्याण स्वामी वगळता अन्य शिष्यांमध्ये मोठीच धास्ती पसरली की आता उत्सव नेहमीच्या उत्साहात साजरा होईल की नाही? समर्थाच्या कानावर ही धास्ती पोहोचली. ते काही बोलले नाहीत. रात्री कल्याणांना त्यांनी बोलावून घेतलं आणि एकापाठोपाठ एक असे ‘मनाचे श्लोक’ सांगितले. कल्याण स्वामींनी ते उतरवून घेतले. दुसऱ्या दिवशी प्रत्येक शिष्यानं दारोदारी जाऊन खडय़ा आवाजात हे श्लोक उच्चारत भिक्षा मागितली. नेहमीपेक्षा अधिक धान्य आणि धनही जमा झालं आणि पाठोपाठ महाराजांकडची मदतही आली! तर खरा आधार जगाचा की परम सद्गुरू तत्त्वाचा ही जाण करून देण्यासाठीच या श्लोकांचा जन्म झाला आहे. त्यामुळे सद्गुरू आधार हाच या श्लोकांचा कणा आहे. त्याची सुरुवात आता कुठं होत आहे, पण ही जणू पहाटेची वेळ आहे. सूर्य पूर्ण उगवलेला नाही. अगदी त्याचप्रमाणे सद्गुरू आधाराचा विषय किंचित प्रकाशमान होऊ  लागला आहे. जसजसे श्लोक पुढे सरकत जातील तसतसा हाच मुख्य विषय प्रकाशमान होईल. तर या श्लोकापासून समर्थ सूचित करीत आहेत की परमात्मा नेहमीच अवतरित होतो, अनेक रूपांत.. विविध रूपांत प्रकटतो.. आणि हा अवतार असतो सद्गुरू रूपातला! ‘गुरुगीते’त म्हटलं आहे, हा जो सद्गुरू आहे तो ज्ञानावतारच आहे तो अनेक रूपांत प्रकटतो (विद्यावतारसंसिद्धौ स्वीकृतानेकविग्रह). आणखी म्हणतात, ‘नवाय नवरूपाय परमार्थेकरूपिणे। सर्वाज्ञानतमोभेद भानवे चिद्घनाय ते।।’ हा सद्गुरू नित्य नवं रूप धारण करतो, पण ते कशासाठी? तर परमार्थासाठी. सर्व अज्ञानाचा अंध:कार या सूर्याच्या बोधप्रकाशानं नष्ट होतो. म्हणूनच समर्थही म्हणतात.. ‘‘जनाकारणें देव लीळावतारी। बहूतांपरीं आदरें वेषधारी!!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2017 2:19 am

Web Title: samarth ramdas philosophy 287
Next Stories
1 ४१४. कलंकी अवतार
2 ४१३. अज्ञान-कपारी
3 ४१२. बोधचंद्र
Just Now!
X