नालासोपाऱ्यात आंदोलन; प्रवासकोंडीमुळे वाहतुकीचा प्रश्न जटिल

टाळेबंदीमुळे होणाऱ्या प्रवासकोंडीने नोकरदारांच्या संयमाचा बांध फुटू लागल्याचा प्रत्यय बुधवारी आला. उपनगरी रेल्वे आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास नाकारल्याने संतापलेल्या  नोकरदारांचा नालासोपाऱ्यात उद्रेक झाला.

अनेक खासगी कंपन्यांनी कार्यालयात उपस्थित राहिल्यासच वेतन देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे प्रवासीसंख्या वाढली असून, वाहतुकीचा प्रश्न जटिल झाला आहे.

टाळेबंदी अंशत: शिथिल झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह केंद्रीय आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू झाली. खासगी कंपन्यांनाही दहा टक्के किंवा जास्तीत जास्त दहा कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच बेस्टच्या बस, एसटीमधून खासगी कंपन्यांतील कर्मचारीही मोठय़ा प्रमाणात प्रवास करू लागले. मात्र, पुरेशी वाहतूक सुविधा नसल्याने नोकरदारांमध्ये खदखद होती. नालासोपाऱ्यात बुधवारी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.

एसटीने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसमध्ये प्रवेश दिल्याने प्रवाशांनी बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास आगार परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. काही प्रवाशांनी लगतच्या रेल्वे स्थानकात रुळांवर उतरून चर्चगेटच्या दिशेने जाणारी रेल्वे अडवली. मात्र, रेल्वे पोलिसांनी आंदोलकांना स्थानकाबाहेर काढले. या आंदोलनामुळे रेल्वेसेवा ४ मिनिटे विस्कळीत झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. याप्रकरणी १५० जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी दिली. नालासोपारा एसटी आगारात प्रवाशांनी मंगळवारीही घोषणाबाजी करीत गोंधळ घातला होता. त्यातच बुधवारच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही प्रवासाची परवानगी द्यावी, अन्यथा आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, असा इशारा उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिला. करोना काळात रेल्वेतर्फे चालवल्या जाणाऱ्या विशेष लोकल वासिंद आणि वांगणी रेल्वे स्थानकात थांबत नसल्यामुळे या ठिकाणांहून प्रवास करणारे हजारो अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी संतप्त झाले आहेत. या स्थानकांत रेल्वे थांबवण्याची मागणी कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केली.

या प्रवासकोंडीमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले असून, काहींना रोजगारावर पाणी सोडावे लागत आहे. बोरीवलीतील सागर पाटील यांचा सोलार दिवे आणि अत्यावश्यक विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्राचा व्यवसाय आहे. अंध असलेल्या पाटील यांनी या व्यवसायाद्वारे अनेकांना रोजगार दिला आहे. मात्र, रेल्वेसेवेअभावी त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. अंध व्यक्तींसाठी लोकलचा प्रवास अधिक सोपा असतो. माझे अनेक अंध मित्र रुग्णालय, बँक , खासगी कंपन्यांमध्ये आहेत. त्यांनाही बसप्रवास त्रासदायक होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

‘अंतरनियम पाळून रेल्वेप्रवास शक्य’

टाळेबंदीआधी उपनगरी रेल्वेतून रोज ७५ लाख लोक प्रवास करत होते. अत्यावश्यक सेवेसह अन्य प्रवाशांना प्रवासाची मुभा दिल्यास ही संख्या १५ लाखांपर्यंत निश्चित करता येऊ शकते. त्यासाठी नियोजन, संशोधनाची आवश्यकता आहे, ज्येष्ठ वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी सांगितले. कार्यालयीन वेळा बदलणे, खासगी कार्यालयांशी संपर्क साधून दोन पाळ्यांतील कामांची निश्चिती, त्यानुसार तिकीट व पासाचे वाटप यासह अन्य उपाययोजना केल्यास अंतरनियम पाळून रेल्वेतून प्रवासी वाहतूक शक्य आहे, असे त्यांनी दातार यांनी स्पष्ट केले.

खासगी कार्यालयांमध्ये १० टक्के उपस्थितीचे आदेश

असतानाही मोठय़ा प्रमाणावर कर्मचाऱ्यांना बोलावले जाते. कार्यालये सुरु केली, तर किमान त्यांच्यासाठी वाहतुकीची सुविधा तरी उपलब्ध होणे गरजेचे आहे. एसटी, बेस्ट सेवेवर पडणारा ताण पाहता रेल्वे प्रवासाचेही नियोजन झाले पाहिजे.

– लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ