राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची तयारी सुरु केली आहे. आता मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी एमआयएमचे आमदारही आक्रमक झाले आहेत. येत्या एक डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोषाची तयारी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिम समाजाने जल्लोष कधी करायचा याची मुख्यमंत्रीसाहेबांनी तारीख सांगावी, अशी मागणी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असाल तर आम्हालाही आरक्षण पाहिजे, अशी भूमिका मांडत हे सरकार मुस्लिम विरोधी असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

यावेळी एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलाल हेही होते. दोन्ही आमदारांनी मुस्लिम आरक्षणाच्या मागणीचे बॅनर घेऊन विधीमंडळ परिसरात प्रवेश केला होता. आमदार पठाण म्हणाले, हे सरकार मुस्लिम विरोधक आहे. आरक्षण देण्याची त्यांची नियत नाही. मराठ्यांना आरक्षण देत आहात. मग आम्हालाही द्या. एक तारखेला तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देत आहात. मग आम्हाला खूशखबर कधी देणार, असा सवाल उपस्थित केला. मुस्लिम समाजही आरक्षणाच्या प्रतिक्षेत असल्याचे ते म्हणाले.