करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनंतर राज्यातील उद्योग, व्यवसायांसह रेल्वे व सावर्जनिक वाहतूक सेवा बंद होती. ती आता अनलॉक प्रक्रियेत हळूहळू सुरळीत होत आहे. मात्र, अद्यापही पूर्णपणे सर्व ठिकाणची वाहतूक सेवा सुरळीत झालेली नाही. शिवाय, शाळा महाविद्यालयांसह अनेक कार्यालयं देखील बंदच आहेत. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल ट्रेन देखील अद्याप सुरू झालेली नसल्याने, चाकरमान्यांना घरूनच काम करावे लागत आहे. तर अनेकांचे रोजगार देखील गेलेले आहेत. अशावेळी लोकल पुन्हा कधी रुळावर धावणार? शिवाय राज्यातील बंद असलेली शाळा, महाविद्यालयं व कार्यालयं कधी सुरू होणार? हे प्रश्न सर्वांच्याच मनात आहेत.

या पार्श्वभूमीवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (टीआयएफआर) एक महत्वपूर्ण अहवाल मुंबई महापालिकेकडे सोपवला आहे. ज्यानुसार १ नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील सर्व कार्यालयांसह वाहतूक सुविधा पूर्णपणे सुरळीत करता येऊ शकेल असे सांगण्यात आले आहे.  टीआयएफआरने कोविड-१९ चा गणितीय दृष्टकोनातून अभ्यासकरून हा अहवाल तयार केला आहे. याचबरोबर स्कूल ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड कॉम्प्यूटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांनी प्रल्हाद हर्षा व रामप्रसाद सप्तर्षी यांच्यासह अहवाल सादर करत, शाळा जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याची शिफारस केली आहे.

हर्ड इम्यूनिटीच्या टीमने म्हटले आहे की, डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत झोपडपट्टी भागात राहणाऱ्या जवळपास ७५ टक्के आणि इतर वस्तीत राहणाऱ्या ५० टक्के लोकांमध्ये अँन्टिबॉडीज निर्माण होतील. या अहवालात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मागील १५ दिवसांमध्ये दिलेल्या जागतिक संस्थेच्या इशाऱ्या संदर्भात उल्लेख केलेला नाही. तर टीआयएफआरच्या टीमने सांगितले की, सप्टेंबर महिन्यात शहरातील अनलॉक ३० टक्क्यांपर्यंत वाढवलं गेलं पाहिजे. ज्यामध्ये कार्यालयांमधील उपस्थिती व वाहतूक व्यवस्थेचा देखील समावेश असेल. तर, ऑक्टोबरपर्यंत हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढलं पाहिजे. शहरातील सर्व व्यवहार टप्प्याटप्याने व पूर्ण क्षमतेने १ नोव्हेंबर पर्यंत सुरळीत व्हायला हवेत. असं जुनेजा म्हणाले. याचबरोबर हे सर्व करताना करोना संसर्ग टाळण्यासाठी ठरवण्यात आलेल्या सर्व नियमांचे जसे की, सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, सॅनिटाइझेन, रेल्वे व कार्यालयांमधील नियमीत निर्जंतुकीकरण व स्वच्छता इत्यादींचे काटेकोर पालन व्हायला हवे असे देखील त्यांनी सांगितले.

करोनामुळे बिघडलेली देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मुंबईसह देशभरातील अन्य शहर पूर्वीप्रमाणे सुरू होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर टीआयएफआरच्या टीमने अभ्यास करून या संदर्भातील हा अहवाल तयार केला आहे.