पालिकेकडे ३३६ तक्रारी, २६४ खड्डे बुजवले

मुंबई : पावसाने दडी मारलेली असली तरी मुंबईत रस्त्यांवर खड्डे पडू लागले आहेत. खड्डय़ांच्या तक्रारी करण्यासाठी पालिकेने दरवर्षीप्रमाणे यंत्रणा सुरू केली असून पालिकेच्या मोबाइल अ‍ॅपवर आतापर्यंत ३३६  तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यापैकी २६४ खड्डे बुजवण्यात आले आहेत. खड्डय़ांच्या सर्वाधिक तक्रारी कुर्ला परिसरातून आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय शहर अशी ख्याती असलेल्या मुंबई शहरातील रस्त्यांची दुरवस्था हा नेहमीच चेष्टेचा विषय असतो. रस्त्यांच्या या दुरवस्थेला दरवेळी पावसाला व वाहनांना जबाबदार धरले जाते.

या वर्षी मात्र पाऊसही कमी पडला असून टाळेबंदीमुळे रस्त्यावरील वर्दळही कमी आहे. त्यामुळे यंदा रस्त्यांवरील खड्डय़ांचे प्रमाण कमी आहे. तसेच पालिका प्रशासनाने २०२०-२१ या आर्थिक वर्षांत रस्त्यांच्या सुधारणेवर अधिक भर दिला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या सुधारणेसाठी १६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे खड्डय़ांच्या तक्रारी करण्यासाठी पालिकेने २४ विभागांसाठी रस्ते अभियंत्यांचे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या तीन वर्षांपासून पालिकेतर्फे दरवर्षी असे क्रमांक जाहीर केले जातात. मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांची तक्रार स्वीकारण्याकरिता पालिकेने    ेूॠे  हे मोबाइल अ‍ॅपही आधीच सुरू केले आहे. रस्त्यावरील खड्डय़ाची छायाचित्रे काढून या अ‍ॅपवर अपलोड करता येतात. त्याचबरोबर १८००२२१२९३ या मोफत मदत क्रमांकावरही तोंडी तक्रार करता येणार आहे.

खड्डय़ांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आम्ही या वर्षी मोठय़ा प्रमाणावर कोल्डमिक्सचे उत्पादन केले आहे. ११५० टन कोल्डमिक्स विभाग कार्यालयांमध्ये वितरित केले असून गरज लागल्यास आणखी कोल्डमिक्स दिले जाईल, अशी माहिती रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

२६ तक्रारी कुर्ला विभागातून

खड्डय़ांच्या एकूण ३३६ तक्रारींपैकी २११ तक्रारी या २४ विभागांतून आलेल्या आहेत. तर  ६१ तक्रारी पालिकेच्याच अन्य विभागांतून आलेल्या आहेत. चोवीस विभागांतील तक्रारींपैकी सर्वाधिक २६ तक्रारी कुर्ला विभागातून आल्या आहेत. यापैकी ११ तक्रारींचे अद्याप निवारण केलेले नाही.

रस्त्यांच्या कामावर देखरेखीसाठी त्रयस्थ परीक्षक ; तीन वर्षांसाठी पालिका कंत्राटदार नेमणार

मुंबई : रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने त्रयस्थ कंत्राटदार (थर्ड पार्टी ऑडिटर) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सल्लागार तीन वर्षांसाठी नेमण्यात येणार आहेत. पालिकेने त्याकरिता निविदा मागवल्या आहेत.

रस्त्यांच्या कामात त्रयस्थ सल्लागारांनी केलेल्या कामचुकारपणामुळे रस्ते घोटाळा झाल्याचा अनुभव असताना पुन्हा एकदा पालिकेने तोच कित्ता गिरवल्यामुळे पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यानंतर ज्या मोठय़ा रस्त्यांचे काम हाती घेतले जाणार आहे विशेषत: त्यांच्या देखरेखीसाठी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. नेहमीची रस्त्यांची कामे ही पालिकेच्या अभियंत्यांमार्फतच केली जाणार आहेत. मोठय़ा प्रकल्पांचे संकल्पनाचित्र तयार करून कामावर देखरेख ठेवणे, रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्यावर देखरेख ठेवणे ही कामे कंत्राटदारांवर सोपवली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या कंत्राटदारांना आपापल्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातील. एखाद्या ठिकाणी रस्त्यासाठी आरक्षित जागा पालिकेला मिळाली असेल आणि तिथे संपूर्णपणे नवा रस्ता २०० किंवा ५०० मीटरचा रस्ता बांधायचा असेल तर अशा रस्त्याचा पाया खणण्यापासूनची कामे या कंत्राटदाराला दिली जाणार असल्याची माहिती रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सन २०१६ मध्ये रस्त्यांच्या कामामध्ये झालेला घोटाळा प्रचंड गाजला होता. अनियमितता असल्याची तक्रार तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केल्यानंतर तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी आदेश दिले होते. दोन वर्षे चौकशी सुरू आहे.