वांद्रे येथील भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी राजावाडी रुग्णालयाच्या घटनेनंतर संताप व्यक्त करत मुंबई महानगरपालिकेला फटकारले आहे. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या डोळ्याला उंदराने चावा घेऊन जखमी केल्याचे मंगळवारी निदर्शनास आले होते. त्यावरुन आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेचे १ हजार २०६ कोटींचे आरोग्याचे बजेट कोण खात आहे? असा सवाल केला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. याआधी देखील सायन रुग्णालयात करोनामृतांच्या शेजारीच रुग्णांवर उपचार केले जात असल्याची घटना समोर आली होती.” सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारी मुंबईकरांना उपचार घ्यावे लागतात आणि राजावाडीत आयसीयूमध्ये रुग्णांचे डोळे उंदीर कुरतडतात मग ८० हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई महापालिकेचे १ हजार २०६ कोटींचे आरोग्याचे बजेट कोण खाते?कोण तिजोरी कुरतडतेय? अत्यंत दुर्दैवी घटना आणि संतापजनक सारे!,” असे म्हणत शेलार यांनी पालिकेवर घणाघात केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कुर्ला कमानी येथील इंदिरा नगरचे रहिवासी श्रीनिवास येल्लपा (वय २४) याला सहा महिन्यांपासून फुफ्फुसाचा आजार आहे. दोन दिवसांपूर्वी त्याची प्रकृती बिघडल्याने रविवारी रात्री घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेला श्रीनिवास हा बेशुद्धावस्थेत होता. त्याची बहीण यशोदा येल्लपा मंगळवारी सकाळी त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात आली असता, श्रीनिवासच्या डोळ्याच्या वर आणि डोळ्यांच्या खाली जखमा आढळून आल्या. उंदराने त्याच्या डोळ्याला चावा घेतल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने रुग्णालयात असलेल्या परिचारिका याना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत तिने राजावाडी रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे देखील तक्रार दाखल केली.

“मुंबई महापालिकेला शरमेनं मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे”

त्यानंतर हे प्रकरण वाढल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णाची भेट घेऊन या प्रकरणाची दखल घेतली आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे महापौर यांनी सांगितले. रुग्णालयात घडलेला हा प्रकार गंभीर असून नेत्ररोग विभागाच्या डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली आहे. डोळ्याला इजा झालेली नाही रुग्णाच्या पापण्याखाली जखमा झालेल्या आहे. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.