मनसेची टीका, शिवसेनेची साथ

मुंबईमध्ये विकासकांकडून मांसाहारींना सदनिका विक्री करण्यास नकार देण्यात येत असल्याच्या प्रकारात पालिका काहीही करू शकत नाही अशी भूमिका घेत त्याबाबत सुधार समितीच्या बैठकीत सादर केलेला प्रस्ताव मनसेने रोखून धरला. तर स्थायी समितीच्या बैठकीत साथ सोडणाऱ्या भाजपला अद्दल घडविण्यासाठी शिवेनेने मनसेची साथ दिली. मुख्यमंत्र्यांनी पालिकेत हस्तक्षेप थांबवावा, असा टोला मनसेच्या नगरसेवकांनी लगावताच भाजप नगरसेवकांचा गोंधळ उडाला.

आहार पद्धती, धर्म किंवा जात या कारणास्तव निवासी संकुलांमध्ये घर नाकारणाऱ्या विकासकांना आराखडे नापसंतीची सूचना, बांधकाम सुरू करण्यास प्रमाणपत्र, तसेच जलजोडणी यासारख्या पालिकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधा स्थगित करण्यात याव्यात, अशी मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडून केली होती. त्यावरील प्रशासनाचा अभिप्राय सुधार समितीच्या गुरुवारच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. एखाद्या विकासकाकडून ग्राहकास सदनिका देण्यापूर्वी तो शाकाहारी किंवा मांसाहारी आहे हे लिहून घेत असल्यास ही बाब विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींमध्ये येत नाही. त्यामुळे त्याबाबत कोणतीही अट त्यात अंतर्भूत करता येणार नाही. ही बाब पालिकेच्या कक्षेबाहेर आहे, असे प्रशासनाने अभिप्रायात स्पष्ट म्हटले होते. प्रशासनाच्या या उत्तरामुळे मनसेचे नगरसेवक संतप्त झाले होते. या प्रकरणात प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट पाहात आहे का, असा सवाल मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी करताच भाजप नगरसेवकाची चुळबूळ सुरू झाली. त्याच वेळी शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी सभात्याग करण्याचा सल्ला मनसेला दिला. शिवसेनेच्या सल्ल्याचे बळ मिळताच बैठकीतील वातावरण तापले. या गोंधळात हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याचा प्रयत्न सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे करीत होते. मात्र मनसेसह सर्वच विरोधी पक्षाने भाजपवर टीकास्र सोडण्यास सुरुवात केली. शिवसेनेनेही साथ सोडल्यामुळे भाजप नगरसेवक एकाकी पडले आणि अखेर गंगाधरे यांनी हा प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारार्थ पाठविला.