ओबीसी समाजाला हिंदू धर्मात नव्हे, तर राजकारणात जाच आहे, अशी भूमिका घेऊन ओबीसींमधील काही समाज संघटनांनी सुरू केलेल्या धर्मातर चळवळीकडे दुर्लक्ष करणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या राजकीय बालेकिल्ल्यात म्हणजे नाशिकमध्येच येत्या रविवारी, २२ सप्टेंबरला धर्मातर जनजागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत माळी, तेली, कोळी, कोष्टी, शिंपी, इत्यादी ओबीसींमधील सुमारे १५ जाती संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत ओबीसींचे प्रश्न आणि धर्मातरावर दिवसभर चर्चा होणार आहे.
महाराष्ट्रात छगन भुजबळ व गोपीनाथ मुंडे हे ओबीसींचे प्रस्थापित राजकीय नेते मानले जातात. परंतु गेल्या वर्षभरापासून ओबीसींमधील काही समाजातील सुशिक्षित मंडळींनी संघटित होऊन धर्मातराचीच चळवळ सुरू केल्यामुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. महाराष्ट्र सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांच्या नेतृत्वाखाली ‘ओबीसी बांधव आता बुद्ध धम्माच्या वाटेवर’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून विभागवार ओबीसींच्या धर्मातर जनजागृती परिषदा घेण्यात येत आहेत. या पूर्वी नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबादमध्ये परिषदा झाल्या आहेत. आता येत्या रविवारी नाशिकमध्ये परिषद घेण्याची जारदार तयारी सुरू केली आहे. छगन भुजबळ यांचा ओबीसींच्या धर्मातराला विरोध आहे. मात्र आता त्यांच्याच राजकीय वर्चस्व असलेल्या नाशिकमध्ये धर्मातर जागृती परिषद होत आहे. या धर्मातर चळवळीत आता ओबीसींमधील अनेक जाती संघटना सहभागी होत आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या परिषदेला माळी, तेली, कोष्टी, नामदेव शिंपी, शिंपी, भावसार, परिट-धोबी, धनगर, बंजारा, सुतार, महादेव कोळी, आगरी, लोहार, गवळी इत्यादी सुमारे १५ ओबीसी समाज संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.