नियमित सभासदांची पाठ; चालकांच्या अडचणींत भर

मुंबई : दसऱ्यापासून राज्यातील व्यायामशाळा सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली असली तरी करोना संसर्गाच्या भीतीमुळे नियमित सभासदांनी व्यायामशाळांकडे पाठ फिरवली आहे. सध्या १० ते १५ टक्के ग्राहकच व्यायामशाळेत येत आहेत. त्यामुळे व्यायामशाळा चालक आणि प्रशिक्षक संकटात सापडले आहेत.

राज्य सरकारने दसऱ्यापासून व्यायामशाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार करोनापासून संरक्षणासाठी व्यायामशाळा चालकांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये जागोजागी मार्गदर्शक सूचनांचे फलक लावण्यात आले आहेत. सामाजिक अंतराच्या पालनासाठी मर्यादित व्यक्तींना प्रवेश, प्रशिक्षकांसाठी हॅण्ड ग्लोव्ह्ज, मास्क आदींची खरेदी, व्यायामशाळेत सॅनिटायझर, त्याचबरोबर व्यायामशाळेच्या निर्जंतुकीकरणासाठी फॉग मशीन आदींची व्यवस्था केली आहे. मात्र ग्राहकांनी पाठ फिरविल्याने व्यायामशाळा चालक अडचणीत सापडले आहेत. करोनाची लागण होण्याच्या भीतीने जानेवारीपर्यंत व्यायामशाळेत व्यायामासाठी येणार नसल्याचे ग्राहकांकडून या चालकांना सांगितले जात आहे.

‘टाळेबंदीआधी दरदिवशी ५० ते ६० सभासद व्यायामासाठी येत. सध्या १० व्यक्तीच येत आहेत. अनेकांशी फोनद्वारे संपर्क साधल्यावर ते करोनाची लागण होण्याची भीती व्यक्त करतात. सध्या एका तासात फक्त आठ लोकांना व्यायामशाळेत प्रवेश देऊ शकतो. तरीही दोनच जण येत असल्याने व्यायामशाळा रिकामीच असते,’ अशी व्यथा घाटकोपर येथील फिटफुल फिटनेस जिमचे भूषण पवार यांनी मांडली.

‘मागील आठ महिने व्यायामशाळा बंद असल्याने उत्पन्न नव्हते. परिणामी या आठ महिन्यांचे गाळ्याचे सात लाख रुपयांचे भाडे थकीत आहे. टाळेबंदीच्या आधी सहा महिने वरळी परिसरात नवीन व्यायामशाळा सुरू केली होती. त्याचे कर्जाचे हप्ते थकीत आहेत. टाळेबंदीआधी दररोज १४० ते १५० सदस्य व्यायामासाठी येत. सध्या १० ते १५ जणच येतात. यात देखभाल खर्च निघणेही अवघड आहे,’ असे बॉडी गॅराझ या जिमचे मालक सुशांत पवार यांनी सांगितले.

नोकऱ्यांवर टांगती तलवार

व्यायामशाळेत सर्व खबरदारी घेतली जात आहे. सामाजिक अंतर पाळण्यासाठी सदस्यांना व्यायाम करताना शारीरिक आधार देण्याऐवजी प्रशिक्षक फक्त तोंडी सूचना देत आहेत. व्यायामशाळा सुरू झाल्या असल्या तरी व्यवसायाअभावी या क्षेत्रातील अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे, असे प्रशिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.