News Flash

मेट्रो प्रकल्पांवर भर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी १६० कोटी रुपये आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मेट्रो प्रकल्पांवर भर
(संग्रहित छायाचित्र)

शहरांतील जाळे विस्तारणार;  एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी ७४८६ कोटींची तरतूद

मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या शहरांना एकमेकांशी जोडणाऱ्या मेट्रो वाहतुकीचे जाळे पसरवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नव्या आर्थिक वर्षांसाठी तब्बल ७४८६ कोटींची तरतूद आपल्या अर्थसंकल्पात केली आहे. त्याचबरोबर शिवडी-न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंक आणि विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गासाठीही पाच हजार २५० कोटी प्रस्तावित करून प्राधिकरणाने या मार्गाच्या उभारणीलाही बळ दिले आहे.

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बुधवारी पार पडलेल्या ‘एमएमआरडीए’च्या १४७व्या बैठकीत मुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरणाच्या २०१९-२०च्या १६ हजार ९०९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. या अर्थसंकल्पामध्ये सर्वात जास्त निधीची तरतूद ही मुंबई महानगर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या मेट्रो मार्गिका आणि त्यांच्या विस्तारीकरणावर करण्यात आली आहे. ‘एमएमआरडीए’च्या विकास क्षेत्राची सीमा डहाणू, पालघर आणि रायगडपर्यंत विस्तारली आहे. त्यामुळे भविष्यात या संपूर्ण क्षेत्राला जोडणाऱ्या मेट्रो मार्गाची निर्मिती प्राधिकरणाकडून होणार आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या काही वर्षांत प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो मार्गिका आणि बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी प्राधिकरणाने आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पामध्ये सात हजार ४८६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये मुंबईबाहेरील ‘ठाणे-भिवंडी-कल्याण’ (मेट्रो ५) मेट्रोसाठी १५० कोटी रुपये आणि ‘गायमुख-शिवाजी चौक’ (मीरा रोड) (मेट्रो १०), ‘कल्याण-डोंबिवली-तळोजा’ (मेट्रो १२) मेट्रोसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या मेट्रो मार्गिकांचे व्यवस्थापन आणि संचालनाची जबाबदारी कंत्राटदारांच्या हाती न देता ‘एमएमआरडीए’ स्वत:च्या खांद्यावर घेणार आहे. यासाठी गोरेगावच्या आरे वसाहतीत ३२ मजली मेट्रो भवन बांधण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या भवनातून १३ मेट्रो मार्गाचे संचलन-नियंत्रण होईल. भवनामध्ये प्रशिक्षण केंद्र, मेट्रो संचलन-नियंत्रण केंद्र, कार्यालये आणि प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांसाठी घरे असतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी १६० कोटी रुपये आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजनासाठी अर्थसंकल्पामध्ये ७०४.२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ८८ किमी लांब जलवाहिन्यांद्वारे मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पालिका क्षेत्रात ४०३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

मेट्रोसाठीच्या तरतुदी

* मेट्रो-१ – वर्सोवा-घाटकोपर – ९८ कोटी

* मेट्रो २ अ – दहिसर ते डी.एन. नगर – १८९५ कोटी

* मेट्रो २ ब – डी.एन. नगर ते मंडाले – ५१९ कोटी

* मेट्रो ३ – कुलाबा-वांद्रे-सीप्झ – ६५० कोटी

* मेट्रो ४ – वडाळा-ठाणे-कासारवडवली – १३३७ कोटी

* मेट्रो ५ – ठाणे-भिवंडी-कल्याण – १५० कोटी

* मेट्रो ६ – कांजूरमार्ग -विक्रोळी (जे.व्ही.एल.आर.) – ८०० कोटी

* मेट्रो ७ – दहिसर (पू) ते अंधेरी (पू) – १९२१ कोटी

* मेट्रो १० – गायमुख-शिवाजी चौक – ५ कोटी

* मेट्रो ११ – वडाळा ते सीएसएमटी – ५ कोटी

* मेट्रो १२ – कल्याण-डोंबिवली-तळोजा – ५ कोटी

* मेट्रो भवन – आरे वसाहत – १०० कोटी

वडाळा ट्रक टर्मिनल

अर्थसंकल्पामध्ये वडाळ्यातील ट्रक टर्मिनलच्या जागेचा विकास करण्यासाठी १०.४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या ठिकाणी व्यावसायिक बांधकामे करून ती भाडेतत्त्वावर देण्यात येतील.

मिठी नदी स्वच्छता

मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी पालिकेबरोबर ‘एमएमआरडीए’देखील प्रयत्नशील आहे. यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातून वाहणाऱ्या मिठी नदीच्या पात्राच्या स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना राबविण्याचा मानस अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे.

इतर प्रकल्पांवरील तरतुदी

* महानगर प्रदेशाच्या बाह्य़ क्षेत्रातील रस्ते सुधारणा – १४३ कोटी

* वांद्रे-कुर्ला संकुलात नागरी सुधारणा – ५० कोटी

* मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प – ८०० कोटी

* सातांक्रू झ-चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण, बीकेसी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग उन्नत मार्ग – १०० कोटी

* छेडानगर ते घाटकोपर उन्नतमार्ग सुधारणा – ७५ कोटी

* पूर्व-पश्चिम महामार्ग दुरुस्ती – ५० कोटी

* कलिना विद्यापीठ पायभूत सुविधा – ५४ कोटी

* मुंबई नागरी परिवहन प्रकल्प – ५०० कोटी

मोनोसाठी १५० कोटी

वडाळा ते सातरस्ता हा मोनोचा दुसरा टप्पा रविवारी कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. मोनोच्या संचलनाची जबाबदारी प्राधिकरणाच्या खांद्यावर असल्याने त्यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याद्वारे प्रकल्पाला आर्थिक उभारी देण्याचा प्रयत्न झाला आहे.

बदलापूपर्यंत मेट्रो

‘एमएमआरडीए’च्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कांजुरमार्ग ते बदलापूर’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ या प्रस्तावित मेट्रो मार्गिकांचे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याचे आदेश दिले. महानगर सीमेचा विस्तार झाल्याने मेट्रो मार्ग बदलापूपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. तर नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम सुरू असल्याने भविष्यात मुंबई- नवी मुंबई विमानतळांमधील जलद वाहतुकीसाठी मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

हायब्रिड बस हद्दपार?

बेस्ट प्रशासनाच्या मदतीने चालविण्यात येणारी हायब्रिड बस ‘एमएमआरडीए’ला पांढरा हत्ती पोसण्यासारखी ठरली आहे. यामधून नफा होत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात या बसच्या खरेदीसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

ट्रान्स हार्बर लिंक, बहुउद्देशीय मार्गाना गती

मेट्रो बरोबरीनेच मुंबई बाहेर होणाऱ्या रस्ते वाहतुकीला गती देण्यासाठी ‘ट्रान्स हार्बर लिंक’आणि ‘विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग’ हे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. ‘ट्रान्स हार्बर लिंक’च्या कामाला सुरुवात झाली असून ‘विरार-अलिबाग मार्गा’च्या भूसंपादनाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पांसाठी अनुक्रमे ३ हजार आणि २ हजार २५० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 3:41 am

Web Title: expansion of city metro projects networks
Next Stories
1 कमला मिल आगीप्रकरणी आणखी तिघे दोषी
2 मुंबईतून बेपत्ता झालेल्या ९२० मुला-मुलींचे गूढ कायम
3 कचरा वर्गीकरण हवे, पण आमच्या वॉर्डमध्ये नको
Just Now!
X