कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ याचा नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यासोबत फोटो असल्याचे सांगत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राम शिंदेंवर निशाणा साधला. संतोष भवाळ याच्या फेसबुक अकाउंटवर हा फोटो आहे, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला. दरम्यान, या फोटोमधील व्यक्ती हा आरोपी नसून भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
‘या फोटोवरून भवाळ आणि शिंदेंचे जवळचे संबंध असल्याचे दिसते आहे त्यामुळे कोपर्डी येथील  प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे’ असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. पोलिसांनी देखील गुन्हा नोंदवायला उशीर केला आहे त्यामुळे पोलीस अधिका-यांची देखील कसून चौकशी करण्यात यावी आणि आरोपींना  फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे.या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न जर राम शिंदे  करत असल्याचे समोर आल्यास त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राम शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी आरोपीला ओळखत नाही आणि हा फोटो कधी काढला हे देखील आठवत नसल्याचे एका मराठी वृत्तवाहिनीला त्यांनी सांगितले. ‘या प्रकरणाचे राजकारण न करता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हेगाराला शिक्षा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोपर्डी येथील घटनेचा निषेध विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण  विखे-पाटील यांनीही केला आहे. ‘कोपर्डी येथील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. दिल्लीतल्या निर्भया प्रकरणापेक्षाही हे भयंकर आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पीडित मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी देखील वेळ नाही ही दुदैवाची बाब आहे. या प्रकरणाबाबत सरकारने जी अकार्यक्षमता आणि निष्काळजीपणा दाखवला त्याचा मी निषेध करतो’ असे म्हणत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. तसेच सरकारने  स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.