प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : लघुउद्योगांचे एक छोटे केंद्र आणि सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीमध्ये करोनाचा थैमान सुरू आहे. आजघडीला धारावीतील करोनाबाधितांची संख्या १०६१ वर पोहोचली असून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल ३७ हजारांहून अधिक धारावीकरांना अलगीकरणात ठेवण्याची वेळ पालिके वर ओढवली आहे.

धारावीमधील डॉ. बालिगा नगरमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्याच दिवशी संध्याकाळी शीव रुग्णालयात या रुग्णाचा

मृत्यू झाला. त्यानंतर धारावीमध्ये सातत्याने करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. परिणामी अवघ्या काही दिवसांमध्येच धारावीतील करोनाबाधितांची संख्या १०६१ वर पोहोचली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत दाटीवाटीने झोपडय़ा उभ्या आहेत. जेमतेम दहा बाय दहा फुटांची घरे आणि अरुंद गल्ल्या, सांडपाणी निचऱ्याच्या योग्य व्यवस्थेचा अभाव, स्वच्छता, शौचालयाची

कमतरता अशा विविध कारणांमुळे धारावीत साथीच्या आजारा प्रादुर्भावर होण्याची कायम भीती असते. करोनाच्या संसर्गाचीही परिस्थिती तशीच आहे.

धारावीतील करोनाबाधितांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या गटातील सुमारे ६,४९६, तर कमी जोखमीच्या गटातील सुमारे ३०,७५० जणांचा पालिकेने शोध घेतला आहे. करोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे अति आणि कमी जोखमीच्या गटातील नागरिकांना करोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेने या सर्वाना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी ३१,७२५ जणांना घरातच विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तर पालिकेने व्यवस्था केलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ५,८५७ जणांना ठेवण्यात आले आहे. मात्र घरीच विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आलेल्या ३१,७२५ जणांवर लक्ष ठेवणे यंत्रणेला अशक्य आहे. ही मंडळी सूचना पाळतात की नाही हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घरातच अलगीकरणात राहण्याची सूचना अशा व्यक्तींकडून धुडकावण्यात आली तर धारावीमध्ये करोनामुळे हाहा:कार उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.