महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसे-भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार रमेश धोंगडे यांनी विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी व अपक्ष गटाच्या शबाना पठाण यांचा पराभव करत हे पद हस्तगत करण्यात यश मिळविले. या निमित्ताने सत्ताधारी मनसेच्या हाती प्रथमच तिजोरीच्या चाव्या आल्या आहेत.
शिवसेनेकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे मनसेचा स्थायीवर कब्जा करण्याचा मार्ग आधीच मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले होते. शनिवारी स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया झाली. तत्पूर्वीच  भाजपला शांत करण्यातही मनसेला यश मिळाले. या पदासाठी एकूण नऊ जणांनी अर्ज भरले होते. स्थायीत मनसेचे पाच, शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी तीन, भाजप व काँग्रेस प्रत्येकी दोन तर अपक्ष गटाचे एक असे बलाबल आहे.
दरम्यान, सत्ताधारी मनसेला गतवेळी स्थायी समितीचे सभापतीपद गमवावे लागले होते. यामुळे वर्षभर वेगवेगळ्या अडचणींचा सामना मनसेला करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन मनसेने राष्ट्रवादीप्रणीत महाआघाडीत फूट पाडून शिवसेनेला गळाशी लावले आणि स्थायीवर वर्चस्व निर्माण करण्यात यश प्राप्त केले.