मध्य रेल्वे मार्गावरच्या कोपर स्टेशनवर पेंटाग्राफमध्ये ठिणग्या पडल्या आहेत. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. ओव्हरहेड वायरमध्येही बिघाड झाल्याचे समजते आहे. कोपर स्टेशनवरही लाईट गेले आहेत अशीही माहिती समोर आली आहे. चाकरमानी घरी पोहचतानाच ही घटना घडली आहे.

धीम्या मार्गावरची अप आणि डाऊन दिशेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोपर स्टेशनवर पेंटाग्राफ दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. मात्र यामध्ये पावसाचा अडसर येतो आहे. बिघाड दुरूस्त करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. कल्याण स्टेशनवर यासंदर्भातली उद्घोषणा केली जाते आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने लांब पल्ल्याच्या आणि लोकल गाड्यांची वाहतूक धीम्या गतीने होत असल्याचीही घोषणा कल्याण स्थानकावर केली जाते आहे. सगळ्या लोकल स्टेशनवर पोहचण्यासाठी सुमारे ३० ते ४० मिनिटांचा अवधी लागतो आहे. सीएसएमटीहून निघालेली आणि कल्याणला ९.०४ मिनिटांनी पोहचणारी ट्रेन आत्ता कल्याण स्थानकात पोहचते आहे.

दरम्यान ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या भागांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. पाऊस पडत असल्याने कल्याण, बदलापूरच्या काही भागांमध्ये लाईटही गेली आहे. कोपर स्थानकावरही लाईट नाहीत. या ठिकाणी पेंटाग्राफमधून ठिणग्या कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या अशा दोन्ही लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नोकरीवरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना घरी जाण्यास उशीर होतो आहे आणि त्यांच्या मनस्तापात भर पडते आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.