राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, एकूण बलाबल पाहता सत्तेचा रिमोट कन्ट्रोल हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातील एका सदरातून त्यांनी आपली भुमिका मांडली.

विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्याची आठवण करुन दिली होती. तर दुसरीकडे भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्याने नेतृत्व आमच्याकडेच असेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आलेल्या या विधानाने आता यावर बराच खल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संजय राऊत यांनी आपल्या सदरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचेही कौतुक केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये कृषी, शिक्षण क्षेत्रात केलेलं काम अतिशय उल्लेखनीय असून प्रत्येक आमदाराने ते पहायला हवे असे सूचक विधानही त्यांनी केलं आहे. तसेच प्रचंड धनशक्तीचा सामना केल्यानंतर शिवसेनेला हे यश मिळाल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.

गेल्यावेळी आम्ही स्वतंत्र लढलो होतो मात्र, यावेळी महायुतीचा पाठींबा असूनही शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या त्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षा हा आकडा कमी असल्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र, असे असले तरी महाराष्ट्रातील सत्तेचा रिमोट कन्ट्रोल उद्धव ठाकरेंच्या हातात असल्याचा दावाही संजय राऊत यांनी आपल्या लेखातून केला आहे.