मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी अशा नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला सर्वच राजकीय पक्षांनी आधी विरोध केला होता. आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश होता. पण  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सध्या राज्यभर राबविण्यात येणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाच्या २५ कलमी मागण्यांमध्ये कर्जमाफीपासून ते मोफत विजेपर्यंत अशा विविध मागण्यांचा समावेश असला तरी समृद्धीचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही.

समृद्धी महामार्गाकरिता करण्यात येणाऱ्या भूसंपादनाच्या विरोधात ठाणे, नाशिक जिल्ह्य़ांमध्ये आंदोलन झाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादीने उडी घेतली होती. समृद्धीच्या विरोधात औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठकही झाली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांबरोबर असल्याची ग्वाही देण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा विरोध कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभर हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या मराठवाडय़ात आंदोलन सुरू असून, या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस होता. पुढील महिन्यात उत्तर महाराष्ट्र व नंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात हल्लाबोल आंदोलन केले जाणार आहे. हल्लाबोल आंदोलनासाठी राष्ट्रवादीच्या वतीने २५ कलमी मागण्यांचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव, महागाई कमी करणे, मराठा, मुस्लीम, लिंगायत, धनगर आरक्षण, कायदा आणि सुव्यवस्था, दुधाला भाव आदी साऱ्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. नेमका समृद्धी मार्गाच्या विषयाला बगल देण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांच्या होणाऱ्या भाषणांमध्ये राज्याला भेडसावणाऱ्या साऱ्या प्रश्नांचा समावेश असतो. पण समृद्धीबाबत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून फार काही भाष्य केले जात नाही.

सध्या मराठवाडय़ात आंदोलन सुरू असले तरी औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्य़ांतील मोठय़ा प्रमाणावर जमीन संपादित करावी लागणार आहे. तरीही राष्ट्रवादीने मराठवाडय़ात हा विषय मांडलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.

समृद्धी मार्गासाठी सक्तीने भूसंपादन करण्यास पक्षाचा विरोध कायम आहे. शेतकऱ्यांनी स्वत:हून जमीन देऊ केल्यास किंवा जमीन देण्यास तयारी दर्शविल्यास  विरोधाचे कारण नाही. या मार्गाच्या प्रस्तावित मार्गाच्या आसपास सत्ताधारी नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत. त्याची चौकशी झाली पाहिजे.

 – नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते