News Flash

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षकांची धावपळ

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शाळांकडे देण्यासाठी हाती अवघे तीन दिवस राहिलेले असताना अद्यापही अनेक शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी संपर्कच होऊ शकलेला नाही.

वेळापत्रकानुसार निकाल शाळांकडे देण्यास केवळ तीन दिवस

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शाळांकडे देण्यासाठी हाती अवघे तीन दिवस राहिलेले असताना अद्यापही अनेक शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी संपर्कच होऊ शकलेला नाही. विशेषत: बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात शिक्षकांची धावपळ उडाली आहे. शाळेत पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा नाही, विद्यार्थ्यांशी संपर्क होत नाही अशा परिस्थितीत परीक्षा राहिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा तयार करायचा, असा पेच शिक्षकांसमोर आहे.

गेले वर्षभर ऑनलाइन वर्ग भरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अनेक शाळांना शक्य झाले नाही. नोव्हेंबरमध्ये राज्यातील अनेक भागांत विद्यार्थ्यांचे वर्ग काही दिवसांपुरते तरी भरले असले तरी मुंबईत गेल्या वर्षभरात एकही दिवस प्रत्यक्ष अध्यापन झालेले नाही. ऐन प्रात्यक्षिक परीक्षेच्या तोंडावर दुसऱ्या लाटेची तीव्रता मुंबईत वाढू लागली. त्याच वेळी राज्यमंडळाने लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची परवानगी शाळांना दिली. त्यामुळे अनेक शाळांनी दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्या. दरम्यान, लेखी परीक्षा होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर अनेक कुटुंबे गावी गेली. त्यामुळे आता विद्यार्थी संपर्क क्षेत्रात नाहीत. या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला

आहे. संपर्काबाहेर असलेल्या विद्यार्थ्यांची शोधाशोध करण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार शिक्षकांनी शाळेकडे निकाल देण्यासाठी जेमतेम तीन-चार दिवस अवधी असतानाही अजून अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती मुंबई उपनगरातील एका शाळेच्या शिक्षकांनी दिली.

दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरलेले अनेक विद्यार्थी सध्या संपर्कात नाहीत. अनेक शाळांमध्ये ही स्थिती आहे. पालकांचे मोबाइल क्रमांक असले तरी ते कधी बदलतात. कधी बंद असतात. काही वेळा विद्यार्थी शिक्षकांच्या संपर्कात नसले तरी त्यांचा मित्रांशी संपर्क असतो. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न शिक्षक करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या नववीच्या निकालाचे अभिलेख शाळेत आहेत. मात्र, लोकल प्रवासाची परवानगी नसल्यामुळे शाळेत पोहोचताच येत नाही. त्यामुळे निकालाच्या कामाचे सहा दिवस फुकट गेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांच्या परीक्षा राहिल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर निकालाच्या कामासाठी वेळ वाढवून मिळणे आवश्यक आहे. त्याच वेळी लोकल प्रवासाचीही परवानगी देण्यात यावी.

– पांडुरंग केंगार, सचिव, मुख्याध्यापक संघटना

फोनवरून प्रात्यक्षिक परीक्षा

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबईतील अनेक शाळांमध्ये दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा होऊ शकलेली नाही. अशा काही शाळांनी आता विद्यार्थ्यांना घरी उपलब्ध साहित्यात करता येतील असे प्रयोग देऊन त्याची ध्वनिचित्रफीत पाठवण्याची सूचना दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्यांची ऑनलाइन तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येत आहे.

बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध

बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांकडेच या विद्यार्थ्यांच्या निकालाची जबाबदारी आहे. त्यामुळे शाळेतील नियमित विद्यार्थ्यांबरोबरच बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. ‘बाहेरून बसणारे विद्यार्थी कायम संपर्कात नसतात. त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप करण्यात आले आहेत. पण तेथेही विद्यार्थी प्रतिसाद देतातच असे नाही. त्यांचा निकाल हा स्वाध्याय पुस्तिकांवर अवलंबून आहे. मात्र, विद्यार्थी शोधून स्वाध्याय पुस्तिका घेण्यात अडचणी येत आहेत,’ असे बोरिवली येथील एका शाळेतील शिक्षकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 12:42 am

Web Title: teachers rush search 10th standard students ssh 93
Next Stories
1 रंगमंच कामगारांचा असहकार
2 शहरांत खासगी लसीकरण; ग्रामीण भाग मात्र वंचितच
3 ३० ते ४४ वयोगटाचे प्राधान्याने लसीकरण!
Just Now!
X