‘व्हीजेटीआय’मधील प्रकार; महाविद्यालयाबाहेर कार्यक्रम घेऊनही प्रशासनाकडून कारवाई
अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता ‘फ्रेशर्स पार्टी’च्या आयोजनात पुढाकार घेतला म्हणून माटुंग्याच्या ‘वीर जिजामाता तंत्रशिक्षण संस्थे’च्या (व्हीजेटीआय) दोन विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचा तडकाफडकी आदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संस्थेने पार्टीच्या आयोजनला नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी माटुंग्याच्या हॉलमध्ये ११ ऑगस्टला या पार्टीचे आयोजन केले होते. तरीही नवागत विद्यार्थ्यांशी संपर्क साधून पार्टीचे आयोजन केल्याबद्दल संस्थेने या विद्यार्थ्यांवर कारवाई केली.
इतर कोणत्याही महाविद्यालयाप्रमाणे व्हीजेटीआयमध्ये नवागत विद्यार्थ्यांकरिता पार्टीचे आयोजन केले जात होते, परंतु तीन वर्षांपूर्वी संस्थेने परवानगी नाकारल्याने गेली दोन वर्षे विद्यार्थी बाहेर एखादा हॉल करून पार्टीचे आयोजन करतात. यंदाही नवागत विद्यार्थ्यांकडून ऐच्छिक स्वरूपात वर्गणी जमा करून पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी या पार्टीच्या आयोजनात पुढाकार घेणाऱ्या संस्थेच्या सोशल ग्रुपचा प्रमुख आणि खजिनदार असलेल्या दोन तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना १७ ऑगस्टपर्यंत वसतिगृह सोडण्याचे पत्र देण्यात आले.
पार्टीच्या ठिकाणी काही आक्षेपार्ह असे काहीच घडले नव्हते. बर्गर, समोसा, शीतपेये असे खाद्यपदार्थ होते. नव्या-जुन्या विद्यार्थ्यांनी आपापली ओळख या वेळी करून दिली. नवागतांना संस्थेची माहिती देणारे सादरीकरण या वेळी करण्यात आले, तरीही ही कारवाई का करण्यात आली, असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने केला.

‘अजून काढलेले नाही’
मूळचे औरंगाबाद आणि लातूर येथे राहणारे हे दोन्ही विद्यार्थी अत्यंत सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे मुंबईत नातेवाईक नाहीत. त्यामुळे वसतिगृह सोडायचे म्हटले तर ते कुठे राहणार, असा सवाल या कारवाईला विरोध असलेल्या एका प्राध्यापकांनी केला. या संबंधात संस्थेचे संचालक डॉ. ओमप्रकाश काकडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ‘प्रतिबंधात्मक उपाय’ म्हणून ही कारवाई केल्याचे स्पष्ट केले. आम्ही विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे पत्र दिले आहे. त्यांना काढण्यात आलेले नाही, असे ते म्हणाले.