मुंबई : खंडणीच्या गुन्ह्यात गोवा पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केलेल्या आरोपीने मुंबई विमानतळावरून पलायन केल्याची घटना घडली. आरोपीला पोलीस गोव्याला घेऊन जात असताना हा प्रकार घडला.

उत्तर प्रदेशातील सहारपूर येथील रहिवासी असलेल्या इमाद वसीम खान (३२) याचा गोव्यातील म्हापसा पोलीस शोध घेत होते. त्याच्याविरोधात भादंवि कलम ३४२, १७०, ३२३, , ५०६, ३८९ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी सरकारी अधिकारी असल्याचे सांगून धमकावत होता. आरोपी उत्तर प्रदेशात असल्याची माहिती म्हापसा पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे म्हापसा पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. गोवा पोलिसांनी मंगळवारी त्याला तेथून अटक केली. पोलिसांच्या पथकाने खानला मुंबई मार्गे दिल्ली – गोवा विमानातून गोव्यात नेण्यासाठी तिकीट काढले होते. बुधवारी त्यांचे विमान छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावर पोहोचले. पोलीस पथक खानला टर्मिनल २ वरून टर्मिनल १ वर घेऊन जात असताना त्याने पलायन केले. आरोपीने पोलीस व्यस्त असल्याचे पाहून हवालदार सुशांत चोपडेकरला ढकलले व तो पळून गेला.

हेही वाचा…विविध वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा २२ जूनपासून, आरोग्य विद्यापीठामार्फत घेण्यात येणार परीक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोपडेकर त्यांच्या मागे धावले. मात्र खान चालत्या वाहनात बसला. चोपडेकरने त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा पकडण्यात यश मिळविले, परंतु खानने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि तो पळून जाण्यात यशस्वी झाला, असे चोपडेकर यांनी सहार पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. चोपडेकर यांच्या तक्रारीवरून, सहार पोलिसांनी खानविरुद्ध आयपीसीच्या कलम २२४ आणि ३२३ नुसार गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.