मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील संभाव्य लोकल अपघात रोखणारे मोटरमन सी.एल.कुरिल यांना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सुरक्षा पुरस्काराने सन्मानित केले. प्रसंगावधान दाखवून पॉइंटमन रवी कुमार यांनी प्रवाशाचा जीव वाचविला. त्यांना देखील सन्मानित करण्यात आले. महाव्यवस्थापकांकडून मध्य रेल्वेच्या एकूण ११ कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

देशातील इतर रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेतील मुंबई विभाग सर्वाधिक व्यस्त विभाग आहे. तसेच मुंबई विभागाचे मार्ग प्रचंड गुंतागुंतीचे आहेत. त्यात लाखो प्रवाशांचा प्रवास सुरक्षितरित्या होण्याची जबाबदारी मोटरमनच्या खांद्यावर असते. त्यामुळे मोटरमनला कायम सतर्क राहून, कर्तव्य पार पाडायचे असते.

मुंबईत दररोज सुमारे १ हजार ८१० लोकल धावत असून या सर्व लोकल सुमारे ६४ हजार थांबे घेतात. तसेच, मुंबई विभागातील सिग्नल हे नियमाप्रमाणे डाव्या बाजूला नाहीत. सिग्नल कधी डावीकडे, कधी उजवीकडे, फलाटावर, ओव्हर हेड वायरच्या ठिकाणी उभे आहेत. त्यामुळे, मोटरमनला प्रत्येकवेळी सतर्क राहून सिग्नल पाहून तो पाळावा लागतो.

कल्याण येथील मोटरमन सी.एल.कुरिल हे आसनगाव लोकल चालवित असताना, मध्य रेल्वेच्या पाचव्या मार्गासाठी असलेला सिग्नल बंद असल्याचे लक्षात आले. त्यांनी सिग्नल न ओलांडता तत्काळ संबंधितांना माहिती दिली. त्यानंतर योग्य सिग्नल मिळाल्यानंतरच लोकल पुढे नेली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि बारकाईने निरीक्षण केल्यामुळे लोकल चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचली.

लाखो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करणाऱ्या मुंबई विभागातील मोटरमनला कायम सतर्क राहून कर्तव्य पार पाडावे लागते, याचे उदाहरण सी.एल. कुरिल यांनी दिले.

तसेच संभाव्य लोकल अपघात रोखण्यात यश आले. कल्याण स्थानकात धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना प्रवासी घसरून पडला. ही घटना पॉइंटमन रवी कुमार यांनी पाहिली. त्यांनी तत्काळ लाल सिग्नल दाखवून लोकल थांबवली आणि प्रवाशाचा जीव वाचविला. या दोघांच्या कामगिरीबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी त्यांना सन्मानित केले.

कल्याण स्थानकात धावत्या लोकलमध्ये चढताना घसरलेल्या प्रवाशाचा जीव पॉइंटमन रवी कुमार यांच्या तत्काळ कृतीने वाचला.

मध्य रेल्वेचे जाळे हे गुंतागुंतीचे असून प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर रेल्वेच्या सुरक्षेची जबाबदारी असते. मात्र अनेकदा काही तांत्रिक बाबींमध्ये दोष दिसतो. परंतु, मध्य रेल्वेवरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून अनुचित घटना, संभाव्य अपघात रोखला आहे. या त्यांच्या कृतीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कार्यालयात ११ कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्कार प्रदान केले. यात मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर विभागातून प्रत्येकी २ आणि भुसावळ विभागातील ३ कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. प्रत्येक पुरस्कारात पदक, गौरव प्रमाणपत्र, उत्कृष्ट सुरक्षा कार्याचे प्रशस्तीपत्र व दोन हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली.