मुंबई : बदलत्या काळानुसार मुंबईचे रूप बदलत गेले. विकासाच्या वेगात मुंबईची चाळ संस्कृती हळूहळू कमी होऊन टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. परिणामी, मराठी माणूस मुंबई सोडून दूर उपनगरात विसावू लागला. मात्र याच मुंबईत लहानाचा मोठा झालेल्या अभिनेता अंकुश चौधरी याने काहीही झाले, कितीही पैसे कमावले आणि कितीही मोठा झालो तरीही मी ‘गिरणगाव’ सोडून जाणार नाही’, असा निर्धार व्यक्त केला. गिरणगावची कथा सांगणाऱ्या ‘तोडी मिल फँटसी’ या नाटकाच्या निमित्ताने तो बोलत होता.
काही युवा कलाकारांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘तोडी मिल फँटसी’ या सांगीतिक नाटकाची प्रस्तुती करणारा अंकुश चौधरी आणि निर्मितीसाठी सहाय्य करणारे ‘जिगीषा अष्टविनायक’ संस्थेचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी आणि नाटकाचा दिग्दर्शक विनायक कोळवणकर तसेच कलाकार मंडळी एकत्र आली होती. एकांकिकेपासूनच अभिनयाची सुरुवात करणाऱ्या अंकुश चौधरीने ‘तोडी मिल फँटसी’ या नाटकाला पाठिंबा देण्यामागचा उद्देश स्पष्ट केला.
‘माझ्या ‘ऑल द बेस्ट’ एकांकिकेचे व्यावसायिक नाटक झाले आणि आजवर अनेक भाषांमध्ये त्याचे प्रयोगही झाले. या एकांकिकेचे व्यावसायिक नाटक होण्यासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि महेश मांजरेकर यांनी पुढाकार घेतला होता. आता त्याच पध्दतीने काही वेगळे मांडू पाहणाऱ्या युवा रंगकर्मींना सहकार्य करण्याची माझी भावना आहे. आता ‘तोडी मिल फँटसी’ला जिगीषा अष्टविनायक संस्थेचा भक्कम पाठिंबा मिळाल्याने हे नाटक चांगल्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल’, असा विश्वास अंकुशने व्यक्त केला. ‘तोडी मिल फँटसी’ या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग १८ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार आहे.
कापड गिरण्यांचे शहर म्हणून मुंबईची ओळख होती, परंतु कालांतराने गिरण्या इतिहासजमा होऊन त्यांची जागा आलिशान मॉल्स आणि पब्सनी घेतली. पूर्वी गिरणी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांची मुले आज त्याच मॉलमध्ये काम मिळवताना धडपड करत आहेत. मात्र आजूबाजूच्या चकचकीतपणाची भुरळ त्यांना पडल्याशिवाय राहात नाही. जे खऱ्या आयुष्यात शक्य नाही ते स्वप्नात नक्की होऊ शकते आणि इथेच जन्म घेते ती फँटसी. याच फँटसीवर सुजय जाधव लिखित आणि विनायक कोळवणकर दिग्दर्शित ‘तोडी मिल फँटसी’ हे नाटक बेतले आहे. या नाटकात शुभंकर एकबोटे, प्रमिती नरके, जयदीप मराठे, श्रीनाथ म्हात्रे, सुरज कोकरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
‘मी गिरणगाव जवळून अनुभवले असून या ठिकाणीच माझी जडणघडण झाली. टप्प्याटप्प्यावर सर्व गोष्टी बदलत गेल्या. मी ज्यांच्याबरोबर राहिलो, ती माझी मित्रमंडळी एकेक करत चाळ सोडून दूर गेली. चाळीच्या टोलेजंग इमारती झाल्या, पण तिथे ५० टक्केच मूळ रहिवासी उरले. काम आहे म्हणून हे रहिवासी इथे थांबले आहेत’ असा आपला अनुभव सांगताना आजही गिरणगावातच राहणाऱ्या अंकुशने आपण मुंबई कधीही सोडून जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
‘ब्रॉडवे’ नाटक करण्याची इच्छा
मी रंगभूमीवर ‘गोपाळा रे गोपाळा’ हे शेवटचे नाटक केले, मात्र ‘तोडी मिल फँटसी’सारखे उच्च दर्जाचे ब्रॉडवे नाटक करण्याची इच्छा आहे, असे अंकुशने सांगितले. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी ब्रॉडवे नाटक आणले तर रंगभूमीवर परतण्याचे आश्वासनही त्याने दिले.
नाट्यगृहांमध्ये चित्रपट दाखविणे स्वागतार्ह
विविध नाट्यगृहांमध्ये सर्वाधिक नाट्यप्रयोग हे शनिवारी आणि रविवारी होतात. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार नाट्यगृह रिकामे ठेवण्यापेक्षा तिथे चित्रपट दाखवता येतील, असे मला वाटत होते. सध्या नाट्यगृहात चित्रपट दाखवण्याचा प्रयोग स्वागतार्ह असल्याचेही त्याने सांगितले.