“मुंबई महापालिकेतील गैरव्यवहार लपवण्यासाठीच वसुली गँगचा कट”

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून आमदार अमित साटम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. वसुली गँगचा मोठं कट कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

BJP-MLA-Amit-Satam
भाजपा आमदार अमित साटम (Photo- Indian Express)

मुंबई महापालिकेत गेल्या दोन दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे. भाजपा आणि शिवसेना युती तुटल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती आहेत. दुसरीकडे राज्यातही शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. भाजपा नेते शिवसेनेवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. आता मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून भाजपा आमदार अमित साटम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेत वसुली गँगचा मोठं कट कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रस्ते घोटाळा, भूखंड खरेदी घोटाळा, नालेसफाई घोटाळा अशा विविध गैरव्यवहारांचा त्यांनी पाढा वाचला. तर गैरव्यवहार लपण्यासाठी काय केलं जातं? यावरही बोट ठेवलं.

भाजपा आमदार अमित साटम यांचं टीकास्त्र

“मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये जे गैरव्यवहार झाले आहेत. भ्रष्टाचार झाला आहे. त्यासंदर्भातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे चौकशी खात्याकडे वर्ग केली जातात. मात्र सर्व घोटाळ्याशी संबंधीत कागदपत्रे ही जीर्ण झाली असल्याचे सांगत ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई महापालिकेत अशी महत्त्वाची कागदपत्र जतन करण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसून सर्व भोंगळ कारभार आहे”, अशी टीका भाजपा आमदार अमित साटम यांनी केली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

“ आता भास्कर जाधवांना काही मिळेल, असं कोणत्याही राजकीय शहाण्या माणसाला दिसत नाही ”

“महत्त्वाचे दस्ताऐवज व फाईल्स खराब व जीर्ण करुन त्यातील घोटाळे पुरावे नष्ट करण्याचा घाट मुंबई महापालिकेतील वसुली गँगने सुरू केला आहे. भ्रष्टाचाराची चौकशी होऊ नये यासाठी कादगपत्रे नष्ट करण्याचे वसुली गँगचे कटकारस्थान सुरू आहे. स्थायी समितीने अशा कागदपत्रासाठी कपाटं तयार करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. मात्र वरातीमागून घोडे असा हा प्रकार आहे” असा आरोपही अमित साटम यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp mla amit satam allegation on bmc documents worn out rmt