मुंबई: विरोधी पक्षातील आमदारांची निधी मिळत नसल्याची तक्रार असताना आता भाजपचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी भर सभागृहातच आपली ही खंत बोलून दाखवली. जिल्हा नियोजन निधीतून परिषद आमदारांना निधी द्यायचा नाही असात निर्णय झाला. हा आमच्यावर दुजाभाव असून आमदार निधीही दिला जात नाही. या महत्त्वाच्या विषयावर बोलताना एकही मंत्री आणि नोटिंगसाठी अधिकारी उपस्थित नाही. या सभागृहात येऊन चूक केली, असा घरचा आहेरच त्यांनी सत्ताधारी भाजपला दिला.

विधान परिषद आणि यातील आमदारांना हलक्यात घेतले जात आहे. जिल्हा नियोजनात निधी मिळत नाही. मी या सभागृहात येऊन चूक केली, विधानसभा लढवायला हवी होती अशी खंत परिणय फुके यांनी व्यक्त केली. आता आपण आपापल्या पक्षासाठी लढण्याऐवजी सर्वांनी आपल्या अधिकारांसाठी लढले पाहिजे, या सभागृहाच्या सन्मानासाठी बोलले पाहिजे. सभागृहाने याबाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणी फुके यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली. दरम्यान, हा विषय गटनेत्यांच्या चर्चेत मांडून सभागृहात यावर चर्चा घेऊ. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामकाजमंत्र्यांशी बोलू, असे आश्वासन उपसभापती गोऱ्हे यांनी दिले