मुंबई : राज्यातील महत्त्वाचे राजकीय, सामाजिक विषय आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने विचारमंथन करण्यासाठी भाजपची राज्यस्तरीय चिंतन बैठक ७, ८ व ९ ऑक्टोबरला उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय सरचिटणीस (संघटना) बी.एल. संतोष यांच्यासह काही वरिष्ठ केंद्रीय नेते या बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

भाजपची मूळ भूमिका, विचार आणि कालानुरूप घतले गेलेले निर्णय, देशांतर्गत राजकीय परिस्थिती आदींबाबत वेगवेगळय़ा सत्रांमध्ये तीन दिवस विचारमंथन होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मंत्री यांच्यासह प्रदेश सुकाणू समितीतील नेते, राज्य पदाधिकारी, भाजपचे राज्यातील सर्व खासदार, आमदार आदी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचवण्याचा निर्धार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर आले असले तरी त्यात भाजपची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीस सामोरे जाताना या सरकारकडून पुढील काळात काय अपेक्षा आहेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाबरोबर आपली कशी व काय भूमिका असावी, भाजपची ध्येयधोरणे राबवीत निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवून सरकारच्या कामगिरीचा प्रचार करावा, याबाबत विचारमंथन होणार आहे.