मुंबई : मस्जिद बंदर रेल्वे स्थानकालगत सुरू करण्यात आलेल्या अवैध कबुतरखान्यावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. संबंधित ठिकाणी अनधिकृरीत्या खाद्य विक्री करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी लवकरच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच, तेथे देखरेखीसाठी पालिकेचे पथक तैनात करण्यात आले आहे.

कबुतरांची विष्ठा व पिसांमुळे श्वसनाचे आजार होत असल्याने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यात आले आहेत. प्राणीप्रेमींनी न्यायालयात धाव घेतल्यानंतरही हा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला. महापालिकेतर्फे कबुतरांना खाद्य टाकणे व त्याची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. असे असतानाही मुंबईतील अनेक ठिकाणी पालिकेच्या नियमांना बगल देत कबुतरांना खाद्य टाकले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलालगत अनधिकृतरित्या कबुतरांना खाद्य टाकण्यात येत होते.

तसेच, प्रशासनाचा डोळा चुकवत खाद्य विक्रीही केली जात होती. याबाबत दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये बुधवार, १७ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. अवैध कबुतरखान्याची माहिती मिळताच महापालिकेच्या बी विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. चौकशीअंती खाद्य विक्री करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटताच त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बुधवारी पायधूनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यापुढे पुन्हा अशा प्रकारची बेकायदेशीर कृती होऊ नये, यासाठी बी विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे त्या ठिकाणी न्युसन्स डिटेक्टर व कामगार, कर्मचारी २४ तास तैनात केले आहेत. तसेच, उच्च नायायलाच्या कबुतरांना खाद्य पुरवठा बंद करण्याबाबतच्या आदेशाचे फलक लावण्यात आले आहेत. याशिवाय, महापालिकेतर्फे संबंधित ठिकाणी असलेल्या रचनेवर मास्किंग करणे व सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची व्यवस्था लवकरच प्राधान्याने करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

प्रकरण काय ?

बेस्ट उपकेंद्र इमारतीशेजारी असलेल्या एका झोपडीतील व्यक्ती रेल्वेच्या पादचारी पुलावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना टोपल्यांमध्ये कबुतरांसाठी धान्य विक्री करीत होती. त्यामुळे बेस्ट उपकेंद्र कार्यालयाच्या इमारत व शेजारील झोपड्यांच्या छतावर सहज उपलब्ध होणारे खाद्य टिपण्यासाठी दररोज शेकडो कबुतरे जमत होते. त्यामुळे त्या ठिकाणी अनधिकृत कबुतरखानाच तयार झाला होता.

स्थानिक व्यक्तीमार्फत प्लास्टिकच्या टोपल्यात छोट्या छोट्या वाट्यांमध्ये दाणे भरून ते विक्रीसाठी ठेवले जात होते. त्यावर लाकडाची फळी ठेवल्याने त्यातील खाद्य थेट नजरेस पडत नव्हते. मात्र, दररोज ये – जा करणाऱ्यांकडून दाणे टाकताना अन्य लोकांनाही त्याची माहिती मिळत होती आणि तेही कबुतरांना खाद्य टाकत होते.