मुंबई : गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डे खणल्यास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा प्रति खड्डा तब्बल १५ हजार रुपये दंड करण्यात येणार असल्याच्या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. गणेशोत्सव मंडळांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राजकीय पक्षही मडळांसाठी सरसावले आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार), भाजप आणि शिवसेना (ठाकरे) या पक्षांनी मुंबई महापालिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे. हा मुद्दा येत्या गणेशोत्सवापर्यंत गाजणार असून राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरल्यामुळे येत्या काळात त्याचे राजकारणही होणार आहे.
पीओपीच्या मूर्तींचा न्यायालयीन वाद संपून त्यावर तोडगा निघत नाही तोच गणेशोत्सवाशी संबंधित आणखी एक वाद उफाळून आला आहे. गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्याकरीता मुंबई महापालिकेने यंत्रणा सुरू केली आहे. तसेच मंडळांसाठी मार्गदर्शक सूचनाचे परिपत्रकही काढले आहे. त्यात खड्ड्यांबाबतची सूचना देण्यात आली आहे. महापालिकेने मंडपासाठी खड्डे खणण्यास मनाई केली आहे. खड्डा खणल्यास प्रति खड्डा १५ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. मोठ्या व सुप्रसिद्ध मंडळांचे मंडप मोठे असतात. त्यामुळे त्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. मुंबई महापालिकेच्या या निर्णयाविरोधात गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.
राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. मंडळांसमोरील अडचणी, वाढता खर्च, कमी होणारी वर्गणी आणि त्यातच पालिकेच्या अन्यायकारक धोरणांविरोधात त्यांनी भूमिका मांडली. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे आधीच मुंबईतील रस्ते खड्डेमय झाले आहेत, त्यावर कोणताही दंड नाही.
सार्वजनिक गणेशोत्सव ही एक धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ आहे. तिच्यावर ‘दंडात्मक’ धोरण लादणे अशोभनीय आहे, असे मत मातेले यांनी मांडले. पवईत नुकताच पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एका तरुणाचा बळी गेला, याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच दंडाचा निर्णय मागे घेतला नाही, तर सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मातेले यांनी दिला.
खासदार संजय दिना पाटील यांचाही विरोध
ईशान्य मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनीही पालिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे. हा दंड अवाजवी असून तो तात्काळ रद्द करावा. अशी मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे. मुंबईत सर्वच ठिकाणी हजारो खड्डे पडले आहेत. त्यासाठी कंत्राटदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर किती दंड आकारला आहे, असाही जाबही संजय दिना पाटील यांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे.
दंड कमी करून घेऊ – मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन
प्रति खड्डा १५ हजार रुपये दंड कमी करून घेऊ, असे आश्वासन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गणेशोत्सव मंडळांना दिले आहे. यासंदर्भात लवकर आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या सी विभाग कार्यालयात बुधवारी नागरिकांच्या विविध तक्रारींवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारात एकूण ३१८ तक्रारी दाखल झाल्या व सर्व तक्रारींचे जागीच निराकरण करण्यात आले. या जनता दरबारमध्ये गणेशोत्सव मंडळांनी १५ हजार रुपये दंडाचा विषय मांडला होता. त्यावर मंत्र्यांनी वरील उत्तर दिले.