मुंबई : मुंबईला अथांग समुद्रकिनारा लाभल्यामुळे मोठमोठ्या जहाजांना येथे ये-जा करणे सहज शक्य होते. तसेच मुंबईच्या बंदरावरील ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदर बांधण्यात आले. या दोन्ही बंदरामुळे समुद्रमार्गाने मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक होत आहे. मुंबई, नवी मुंबईतील बंदरांत उतरविण्यात आलेल्या जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंची देशभरात रेल्वे मार्गाने वाहतूक करण्यात येते. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने गेल्या चार महिन्यांत ७४ लाख टन मालवाहतूक केली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने चालू आर्थिक वर्षातील एप्रिल – जुलैदरम्यान ७४ लाख टन मालवाहतूक केली असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षातील याच कालावधीत ७३ लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती. गतवर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात त्यात १.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील १५ वर्षांतील या कालावधीमधील ही सर्वाधिक मालवाहतूक आहे.

कंटेनरच्या वाहतुकीत लक्षणीय कामगिरी

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथून जुलै २०२५ मध्ये एकूण ६४७ रेकची वाहतूक करण्यात आली असून, हा आतापर्यंतचा सर्वाधिक कंटेनर वाहतुकीचा विक्रम आहे. जानेवारी २०२५ मध्ये ६४१ रेक वाहतूक करण्यात आली होती. मुंबई विभागामध्ये एकूण ७६९ कंटेनर रेकची वाहतूक केली.

वॅगनची वाहतूक

जुलै-२०२५ मध्ये दररोज सरासरी १,६१४ वॅगन्सची वाहतूक करण्यात आली. तर, जुलै २०२४ मध्ये १,४०६ वॅगन्सची वाहतूक केली असून १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

कोळशांची वाहतूक

कोळशाच्या वाहतुकीमध्येही उल्लेखनीय वाढ झाली असून, जुलै २०२५ मध्ये ६८ कोळसा रेकची वाहतूक करण्यात आली. जुलै २०२४ मध्ये ४८ रेकची वाहतूक केली होती. यामध्ये ४१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

खतांची वाहतूक

जुलै २०२५ मध्ये कळंबोली माल शेडमधून ३२ खत रेकची वाहतूक करण्यात आली. आर्थिक वर्षात जुलै २०२५ पर्यंत कळंबोली माल शेडमधून एकूण २८८ खत रेकची वाहतूक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेक लोडिंग व अनलोडिंग

जुलै २०२५ मध्ये एकूण १,१४५ रेक लोड करण्यात आले. तर, जुलै २०२४ मध्ये हेच प्रमाण १,०१८ रेक इतके होते. यामध्ये १२ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. जुलै २०२५ मध्ये १,१०४ रेक अनलोड करण्यात आले. तर, जुलै २०२४ मध्ये ९०५ रेक, यानुसार २१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एप्रिल – जुलै २०२५ या कालावधीत एकूण ४,१०० रेकची वाहतूक करण्यात आली. तर, एप्रिल – जुलै २०२४ मध्ये ३,९५१ रेकची वाहतूक करण्यात आली. यात ३ टक्क्यांनी वाढ झाली. एप्रिल – जुलै २०२५ या कालावधीत एकूण ४,२०० रेक अनलोड करण्यात आले. तर, एप्रिल ते जुलै २०२४ मध्ये ३,७९६ रेक, यामध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.