मुंबई-कोकणदरम्यान आणखी दहा मेल, एक्स्प्रेस

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात येणाऱ्या-जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या, प्रवाशांची वाढती गर्दी आणि लोकलच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम टाळण्यासाठी मध्य रेल्वे पनवेल येथे टर्मिनस आणि कळंबोलीमध्ये देखभाल-दुरुस्ती केंद्र उभारत आहे. टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर २०२२ पर्यंत ते पूर्ण होईल आणि २०२३ पासून तेथून मेल-एक्स्प्रेस गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे मुंबई – कोकणदरम्यान आणखी १० किंवा त्यापेक्षा जास्त मेल-एक्स्प्रेस सोडण्याची तयारी मध्य रेल्वे करीत आहे. याशिवाय मध्य रेल्वेवरील सध्याच्या दोन टर्मिनसवरील भार हलका होईल आणि लोकलचे वेळापत्रकही  सुरळीत होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेल-एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवेश केल्यानंतर सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर येथे थांबा आहे. तसेच येथून गाड्याही सोडण्यात येतात. अनेक गाड्या दादर, एलटीटीपर्यंत येताच रिकाम्या होतात. त्यामुळे सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या फारच कमी असते. गेल्या काही वर्षांत तर या तीनही स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांचा भार वाढला आहे. दिवसाला २०० हून अधिक मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांची ये-जा सुरू असते. परिणामी, मेल-एक्स्प्रेसला प्राधान्य द्यायचे की लोकलना असा प्रश्न निर्माण होतो. परिणामी, वेळापत्रक विस्कळीत होते. त्यामुळे मध्य रेल्वेने पनवेल येथे टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाला २०१६-१७ मध्ये मंजुरी मिळताच टर्मिनसच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत टर्मिनसचे सरासरी ७६ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. पनवेल येथे टर्मिनसबरोबरच कळंबोली येथे मेल-एक्स्प्रेस गाड्यांची देखभाल, दुरुस्तीसाठी केंद्रही उभारण्यात येणार आहे. त्यामुळे देखभालीसाठी दक्षिण मुंबईतील वाडीबंदर किंवा माझगाव यार्डपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पनवेल येथे नवीन फलाटांची ६० टक्के कामे  पूर्ण झाली आहेत. प्रवासी भुयारी मार्गाचे ७५ टक्के काम झाले असून अन्य कामेही अंतिम टप्प्यात आहेत. नवीन टर्मिनसमधून २४ डब्यांच्या गाड्या सोडण्याचा विचार आहे. या टर्मिनसमुळे मुंबई – कोकणदरम्यान आणखी १० नवीन गाड्या धावतील. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून आता पनवेल टर्मिनस कार्यान्वित होताच मेल, एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढेल.

दरम्यान, टर्मिनसच्या आजूबाजूची जमीन सिडकोच्या अखत्यारित आहे. यासंदर्भात सिडकोसोबत करण्यात येत असलेला करार अंतिम टप्प्यात आहे. काही कामांसाठी सिडको १.९२ हेक्टर जमीन विनामूल्य सुपूर्द करणार आहे.

पनवेल टर्मिनसचे वैशिष्ट्य काय

– मेल, एक्स्प्रेस गाड्या सुटणार 

– २४ आणि २६ डब्यांच्या गाड्यांसाठी फलाट

– पादचारी पूल, १५०० चौरस मीटर नवीन इमारतीसह अन्य सुविधा

कळंबोली देखभाल कोचिंग केंद्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कळंबोली येथे देखभाल शेड आणि स्थानक इमारतीचे कामही पूर्ण