scorecardresearch

खंडणीप्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; दोघांना अटक; अंगडियांना डांबून ठेऊन पैसे घेतल्याचा आरोप

अतिरिक्त पोलीस आयुक्त(दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) दिलीप सावंत यांनी  याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

दोघांना अटक; अंगडियांना डांबून ठेऊन पैसे घेतल्याचा आरोप

मुंबई: भुलेश्वर परिसरातील अंगडियाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली. याप्रकरणी आणखी एका आरोपी पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी डिसेंबर २०२१ मध्ये चार वेगवेगळय़ा अंगडियांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले. तसेच प्राप्तिकर विभागाला त्यांच्याकडील पैशांची माहिती देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून खंडणीची रक्कम घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त(दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) दिलीप सावंत यांनी  याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामन्यत: पोलीस ठाण्यांमधील गैरप्रकारांची चौकशी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येते. पण याप्रकरणी आणखी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागाबाबतही आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आली होती. पण प्राथमिक चौकशीत अधिकाऱ्यांच्या सहभागाबद्दल कोणतेही पुरावे  मिळाले नाहीत. 

लोकमान्य टिळक(एल.टी.) मार्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक नितीन कदम व उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांना याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) अटक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 या सर्वाविरोधात खंडणी व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते काम करत असलेल्या एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यातच हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी प्रकरण सीआययूला वर्ग करण्यात आले आहे. अंगडिया व्यावसायिक संघटनेचे योगेश गांधी, जतीन शहा, मधुसुदन रावल व मगनभाई प्रजापती यांनी ७ डिसेंबर, २०२१ ला अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांची भेट घेतली व याप्रकरणी तक्रार केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सावंत यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त व सहपोलीस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) यांना माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले होते. प्राथमिक चौकशीनंतर अंगडिया व्यवसायिकांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे निष्पन्न झाले.

या चौकशीत अंगडिया व्यवसायिक, आरोपी पोलीस आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. तसेच पोफळवाडी, मुंबादेवी चौकी व एल.टी. मार्ग पोलीस ठाणे यांच्या सीसीटीव्हींचीही तपासणी करण्यात आली.

प्राथमिक चौकशीत २ ते ६ डिसेंबर २०२१ दरम्यान आरोपी पोलीस अधिकारी व इतर अनोळखी संशयितांनी अंगडिया व्यावसायिकांना डांबून ठेवले, त्यांची बॅग हिसकावण्यात आली व  प्राप्तिकर विभागाला माहिती देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून खंडणी उकळली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Charges filed against three police officers in ransom case both arrested akp

ताज्या बातम्या