मुंबई : शहरातील नागरिकांना निसर्गाच्या अधिक जवळ नेण्यासाठी आणि जैवविविधतेबाबत माहिती मिळावी यासाठी फुलपाखरू स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली आहे. नॅचरलिस्ट एक्सप्लोरर्स आणि नॅचरलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पालघर आणि रायगड या भागांत ही स्पर्धा पार पडणार आहे. यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे.
ही स्पर्धा २१ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार असून इच्छुकांना या निसर्ग निरीक्षण मोहिमेत कॅमेरा आणि मोबाइलसह सहभागी होता येणार आहे. अंडी, अळी आणि फुलपाखरे शोधून त्यांचे फोटो ‘आय नॅचरलिस्ट’ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अपलोड करावे लागतील. प्रत्येक निरीक्षणाला गुण देण्यात येणार आहेत. अंडी ४ गुण, अळी ३ गुण आणि फुलपाखरासाठी २ गुण निश्चित करण्यात आले आहेत. निष्पक्षतेसाठी प्रत्येक प्रजातीला एकदाच गुण दिले जातील, तसेच फक्त जिवंत फुलपाखरे ग्राह्य धरली जातील.
दरम्यान, या मोहिमेत महत्त्वाचा नियम म्हणजे सहभागींनी निरीक्षण करताना जैवविविधतेचा आदर राखणे अपेक्षित आहे. अंडी, अळी किंवा फुलपाखरांना स्पर्श अथवा हलवणे टाळावे, तसेच सर्व छायाचित्रे प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी घेतलेली असणे आवश्यक आहे. स्पष्ट लेबलिंग आणि तपासणी झाल्यानंतर सर्वोत्तम तीन स्पर्धकांना ऑक्टोबरमध्ये वन्यजीव सप्ताहादरम्यान बक्षिसे जाहीर करण्यात येणार आहेत. स्पर्धेची सविस्तर माहिती नॅचरलिस्ट फाउंडेशनच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर देण्यात आली आहे.
एक उत्सवच
फुलपाखरू स्पर्धा ही आता फक्त छायाचित्रण स्पर्धा न राहता, नागरिकांना निसर्गाच्या सौंदर्याशी जोडणारा एक उत्सव ठरत आहे. सहभागी ज्या क्षणी अळीचे फुलपाखरू होणे प्रत्यक्ष पाहतात, त्या क्षणी संवर्धनाची प्रेरणा आपोआप जागृत होते. त्यामुळेच या रंगीबेरंगी पंखांच्या सोबतीने शहरात पुन्हा एकदा निसर्गप्रेमाचा जल्लोष रंगणार आहे.
विंग्स – बर्ड्स ऑफ इंडिया स्पर्धेच्या प्रेरणेतून
पक्षी संवर्धन आणि पर्यावरण जागरूकता वाढविणे या उद्देशाने विंग्स – बर्ड्स ऑफ इंडिया’ पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित केला जातो. यापूर्वी २००५ पासून हा कार्यक्रम ‘बर्ड रेस ऑफ इंडिया’ या नावाने कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता. भारतातील १४ शहरांमध्ये हे पक्षी निरीक्षण आयोजित करण्यात येते. यामध्ये दरवर्षी ५० हून अधिक पक्षी निरीक्षक संघ सहभागी होतात. प्रत्येक संघातील व्यक्ती या कार्यक्रमात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पक्षी निरीक्षण करून त्यांच्या नोंदी करू शकतात. या नोंदी नंतर विंग्स -बर्ड्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर नोंदविण्यात येतात. याशिवाय, दुर्मिळ पक्ष्यांची नोंदही करण्यात येते. याच स्पर्धेची प्रेरणा घेऊन ‘फुलपाखरू स्पर्धा’ आयोजित करण्यात येते.