मुंबई : विधिमंडळातून विचार व चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथाबुक्क्यांनी जनतेमध्ये चुकीचा संदेश जात असल्याबद्दल खंत व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला गंभीर चिंतनाची गरज असल्याचे प्रतिपादन शुक्रवारी विधानसभेत केले. विधिमंडळात गुरुवारी हाणामारी केलेल्या दोघांवर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असूनही त्यांच्यासह काहीजण अधिकृत प्रवेशपत्र नसताना विधिमंडळात दाखल झाले. त्यापद्धतीने उद्या एखादी दहशतवादी घटना घडली, तर ती जबाबदारी कोणाची, असा सवाल फडणवीस यांनी केला.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधिमंडळाच्या प्रवेशद्वारात गुरुवारी झालेल्या हाणामारीच्या घटनेबाबत फडणवीस यांनी विधानसभेत तीव्र नाराजी व खंत व्यक्त केली. आमदारांबरोबर विधिमंडळात कोणीही व्यक्ती प्रवेश करतात. त्याला शिस्त असली पाहिजे. विधिमंडळात गुरुवारी झालेल्या हाणामारीतील सर्जेराव टकले याच्याविरुद्ध पोलिसांकडे सहा गुन्हे दाखल असून नितीन देशमुख विरोधात आठ गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तींना विधिमंडळात अधिकृत प्रवेशपत्राशिवाय प्रवेश कसा दिला जातो आणि ते येऊन विधिमंडळात मारामारी करतात, हे योग्य नाही.

आमदारांनी याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. विधिमंडळ ही आपली एक संस्था आहे. त्यामुळे एखादा आमदार चुकीचा वागला, तरी हा सत्तेचा माज किंवा गैरवापर आहे, असा सर्वांबद्दलच चुकीचा संदेश जनतेमध्ये गेला आहे. कालची घटना अतिशय वाईट होती, असे फडणवीस यांनी नमूद केले.

विधिमंडळ हे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार किंवा कर्मचारी यांच्या मालकीचे नाही. ते राज्यातील १४ कोटी जनतेच्या मालकीचे आहे. समाजाला दिशा देण्याचे काम तेथे झाले पाहिजे. शब्दांद्वारे व्यक्त होणारा विखार हा सापाच्या विषापेक्षा अधिक विषारी असतो. त्यामुळे निवडून आल्यावर प्रत्येक लोकप्रतिनिधीने संसदीय परंपरा, भाषा आणि सातत्यपूर्ण संवाद या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपले काम केले पाहिजे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

विधिमंडळात ओळखपत्राशिवाय प्रवेश नसावा

विधिमंडळ अधिवेशनात अभ्यागतांना सरसकट प्रवेशबंदी करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. त्याबाबत असहमती व्यक्त करीत फडणवीस म्हणाले, काही लोकांनी चूक केली, म्हणून आपण विधिमंडळाचे दरवाजे जनतेला सदासर्वकाळ बंद करु शकत नाही. सुरक्षा उपाययोजना अतिशय कडक केल्या पाहिजेत आणि ओळखपत्र व अधिकृत प्रवेशपत्राशिवाय कोणालाही विधिमंडळ परिसरात प्रवेश देण्यात येऊ नये.

प्रत्येकाने आपले ओळखपत्र गळ्यात घालूनच विधिमंडळात वावरले पाहिजे आणि ते नसल्यास सुरक्षा रक्षकांनी तपासणी करुन संबंधिताला विधिमंडळ परिसराबाहेर काढले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.