विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या निमित्ताने भाजप शिवेसनेत पडलेली दरी काँग्रेस-राष्ट्रवादीने आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेत शिवसेनेला विश्वासात न घेता बजेट बनवणाऱ्या भाजपचा धिक्कार असो, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला भाजपपासून अलग पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसेनेचीही चांगलीच पंचाईत झाली.
विधान परिषदेत बुधवारी अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काव्यात्मक अभिवादन करुन अर्थसकंल्पीय भाषणाला सुरुवात केली. त्याआधी कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नीच्या मुलाखतीचा संदर्भ देऊन केसरकरांचे भाषण रोखण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प बनवण्यास मुनगंटीवार यांच्या पत्नीने व मुलीने मदत केली, असे त्या मुलाखतीत सांगितले आहे, म्हणजे अर्थलंकल्प फुटला आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. मात्र त्याकडे दूर्लक्ष करुन केसरकर यांनी भाषणाला सुरुवात केली.
केसरकर यांनी सुमारे दीड तास अर्थसंल्पाचे वाचन केले. अतिशय रुक्ष ठरलेल्या भाषणामुळे सभागृहातील कुजबूज वाढली. त्यामुळे उपसभापती वसंत डावखरे यांना बेल वाजवून सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन करावे लागत होते. काही लहान-सहान योजना आणि त्यासाठीच्या किरकोळ तरतुदींचा उल्लेख होताच, विरोधी बाकांवरुन वाहवा वाहवा अशा उपरोधिक प्रतिक्रिया उमटत होत्या.